मुंबई : गैरमार्गाचा अवलंब करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले. अशा परिस्थितीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शिवसेनेची भूमिका अनाकलनीय असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

शिवसेना हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. पण भाजपच्या उमेदवाराला पाठिंब्याचा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केली नाही, असेही थोरात यांनी सांगितले. राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणाकरिता सुरू असलेला हा संघर्ष आहे. महिला, पुरुष किंवा आदिवासी-बिगर आदिवासी अशी लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना हा वेगळा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे त्यांना भूमिका घेण्याचा अधिकार आहे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले महाविकास आघाडीचे सरकार ज्यांनी पाडले त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल थोरात यांनी नापसंती व्यक्त केली आहे.