शैलजा तिवले

गंभीर प्रकृतीच्या करोनाबाधितांसाठी मुख्य उपचारांबरोबरच पोषण, व्यायाम, प्रोनिंग अशा सहायक थेरपीच्या (उपचार पद्धती) वापरावर भर देणे अत्यावश्यक असल्याची शिफारस मृत्यू विश्लेषण समितीने नुकत्याच दिलेल्या अहवालामध्ये केली आहे. समितीने मुंबईतील सुमारे पाच हजार करोनाबाधित मृतांचा अभ्यास करून मृत्युदर कमी करण्यासाठी काही सूचना मुंबई पालिकेला केल्या आहेत.

मुंबईत उपचाराधीन रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत कमी झाली असली तरी मृत्युदर मात्र अद्यापही सुमारे सहा टक्के आहे. दरदिवशी होणाऱ्या मृत्यूंमध्ये किंचितच घट नोंदली जात आहे. एकत्रित मृत्युदरावर लक्ष केंद्रित न करता दर आठवडय़ाला नोंदल्या जाणाऱ्या मृत्युदरानुसार उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे समितीने या अहवालात सूचित केले आहे.

करोनाबाधितांचे संभाव्य मृत्यू कमी करण्यासाठी औषधासह श्वसनासंबंधी विकार दूर करण्यासाठी फिजियोथेरपी, प्रोनिंग (रुग्णाला योग्य पद्धतीने वळवून पोटावर झोपविणे), योग्य वेळी योग्य प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा या सहायक थेरपींचा वापर करणे गरजेचे आहे. यामुळे रुग्णांची प्रकृती स्थिर होण्यास मदत होते.  रुग्णांना खूप अशक्तपणा आल्याने पोषणावरही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने  उपाययोजना करण्याची सूचना समितीने केली आहे.

करोनाबाधित रुग्णांच्या फुप्फुसांचे स्नायू अत्यंत कमजोर झालेले असतात. गंभीर प्रकृतीच्या रुग्णांमध्ये योग्य फिजियोथेरपीच्या मदतीने कृत्रिम श्वसनंयत्रणेची गरज कमी होऊन श्वसनक्रिया हळूहळू सुरळीत होण्यासही फायदा होतो.  केईएममध्ये अगदी सुरुवातीपासून रुग्णांना फिजियोथेरपी दिली जात असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

सूचना काय?

* रुग्णांच्या प्रकृतीनुसार त्याला आवश्यक उपचारांनुसार योग्य रुग्णालयात पाठविले जावे.

*  औषधांचा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करावा.

* मृत्युदर अधिक असणाऱ्या रुग्णालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या नियमावलीचा अभ्यास करून त्यानुसार मार्गदर्शन केले जावे.