मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी आणखी १४ वकिलांच्या नावांची शिफारस करणाऱ्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने मंगळवारी मान्यता दिली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाईल,

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाची यासंदर्भात मंगळवारी बैठक झाली. त्यावेळी, उच्च न्ययायालयातील न्यायमूर्तीपदासाठी आठ वकिलांच्या नावांची शिफारस करणारा प्रस्ताव मांडण्यात केला. या प्रस्तावाला न्यायवृंदाने मान्यता दिली. न्यायमूर्तीपदासाठी शिफारस करण्यात आलेल्या वकिलांमध्ये सिद्धेश्वर सुंदरराव ठोंबरे, मेहरोज अशरफ खान पठाण, रणजितसिंह राजा भोंसले, संदेश दादासाहेब पाटील, श्रीराम विनायक शिरसाट, हितेन श्यामराव वेणेगावकर, रजनीशरत्नाकर व्यास. राज दामोदर वाकोडे, नंदेश देशपांडे, अमित जामसांडेकर, आसबीच चव्हाण, वैशाली पाटील जाधव, आबाश्वब शिंदे आणि फरहान दुभाष यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे मंगळवारीच भाजपच्या माजी मुंबई प्रदेश प्रवक्त्या आरती साठे यांच्यासह तीन वकिलांनी उच्च न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. हितेन वेणेगावकर, आशिष चव्हाण, संदेश पाटील आणि श्रीराम शिरसाट हे चौघे सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांची उच्च न्यायालयात दाखल अनेक प्रकरणांत बाजू मांडतात. वेणेगावकर हे सध्या उच्च न्यायालयात मुख्य सरकारी वकील म्हणून पदभार सांभाळत आहेत.