मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे सोमवारी, २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल यांनी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती.
हेही वाचा >>> विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश, शिंदे गटाच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी
शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्यासाठीच्या याचिका विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च याचिका सादर केली आहे. याप्रकरणी तातडीने काही आदेश देण्याची आवश्यकता असल्यामुळे लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती अॅड. सिबल यांनी सरन्यायाधीशांच्या पीठाला केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे गटाने एकमेकांविरोधात दाखल केलेल्या ३४ याचिका फेटाळून लावल्या आहेत.
नार्वेकर यांच्या निर्णयास स्थगितीची मागणी
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या १९९९ च्या पक्षघटनेची प्रत सादर करण्यात आल्याने आणि त्यानंतरच्या घटनादुरुस्तीची काहीच नोंद आयोगाकडे नसल्याने नार्वेकर यांनी त्याघटनेतील तरतुदीनुसार निर्णय दिला आहे. खरी शिवसेना शिंदे यांची असल्याचा निकालही नार्वेकर यांनी दिला होता. निर्णयास निर्णयास त्वरित स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाची याचिकेद्वारे केली आहे.