मुंबई : ‘महाराष्ट्राच्या विधान भवनात यशवंतराव चव्हाण, मधुकरराव चौधरी, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मनोहर जोशी आदी दिग्गजांनी भाषणे केली आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखली. आमचे मतभेद निश्चितच होते, पण मनभेद नव्हते. तसेच जेवढे काँग्रेसचे मुख्यमंत्री सुसंस्कृत होते, तेवढेच शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी सुसंस्कृत होते. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी खूप सुसंस्कृत समजत होते.
मी त्यांच्यावर टीका करीत नाही. ते वेगळ्या विचारसरणीचे आहेत, मात्र आपल्या पिढीतील एक सुशिक्षित मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. सुरूवातीची पाच वर्ष त्यांचा सुशिक्षतपणा पाहिल्यामुळे नवीन कार्यकाळात अपेक्षा वाढल्या होत्या. पण आज मला विनम्रपणे त्यांच्याच जाहिरातीची आठवण करून द्यायची आहे…की देवेंद्रजी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? सध्याची परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे’, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक व वक्ते, माजी मंत्री आणि बहुजन शिक्षण संघाचे संस्थापक दादासाहेब रुपवते यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, १९ जुलै रोजी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. तसेच उल्हास पवार, शिरीष चौधरी, दादासाहेब रुपवते यांची नात उत्कर्षा रूपवते आणि रूपवते कुटुंबियांसह विविध संस्थांचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र ऐनवेळी दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला जावे लागल्यामुळे शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत. ‘दादासाहेब रूपवते अभिवादन सभा’ या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त ॲड. संघराज रुपवते आणि अध्यक्ष बी. आर. कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली.
‘सर्व दिग्गजांच्या केवळ योगदानामुळे नाही, तर त्यांच्या त्यागामुळेही महाराष्ट्र उभा राहिला. तेव्हाची प्रतिष्ठा तुमचे घड्याळ, गाडी आणि घरावरून ठरत नव्हती. तुमची प्रतिष्ठा ही तुमच्या बुद्धिमत्तेवर होती. तो काळ महाराष्ट्राचा होता. पूर्वीच्या आणि आताच्या महाराष्ट्रात प्रचंड बदल झाला असून हे आपले दुर्दैव आहे’, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.