ठाणे ‘मेट्रो’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी लागणाऱ्या जागेचे सर्वेक्षण एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून सुरू केले. मात्र, या प्रकल्पास कासारवडवली भागातील काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे हा प्रकल्प काहीसा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
घाटकोपर ते कासारवडवली या मार्गावर मेट्रो सुरू करण्यात येणार असून त्यासाठी कासारवडवली भागातील ४० हेक्टर जागेवर कारशेड उभारण्यात येणार आहे. या जागेचे सोमवारी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सर्वेक्षण सुरू केले. मात्र, त्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे, तर काहींनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भूमिपुत्रांना रोजगार, बाधित शेतकऱ्यांना टीडीआर यासंबंधी यशस्वी बोलणी झाली आहेत, असा दावा काही शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच या प्रकल्पामुळे विभागातील जमिनीच्या किमतीत वाढ होईल आणि पर्यायाने शेतकऱ्याचा विकास होईल. या प्रकल्पात संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि भूमिपुत्रांना रोजगार मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे, तर दुसरीकडे नोटीस न देताच सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी करत या प्रकल्पास विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, यापूर्वी विकास प्रकल्पात बाधित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकल्पात मोबदला मिळेल काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या जागेऐवजी दुसऱ्या जागेवर कारशेड उभारावी, असेही त्यांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2014 रोजी प्रकाशित
ठाण्यातील ‘मेट्रो’ कारशेडच्या जागेचे सर्वेक्षण सुरू
ठाणे ‘मेट्रो’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी लागणाऱ्या जागेचे सर्वेक्षण एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून सुरू केले. मात्र, या प्रकल्पास कासारवडवली भागातील काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
First published on: 01-07-2014 at 02:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survey for place of thane metro carshed started