मुंबईः गणपती आगमन सोहळा पाहण्यासाठी मैत्रिणीसोबत गेलेल्या १४ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणाला धारावी पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी मैत्रिणीसह रविवारी गणपती आगमन मिरवणूक पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी गर्दीत तिची चप्पल तुटल्यामुळे पीडित मुलगी शेजारी चप्पल शिवण्यासाठी गेली. तेथे बाजूला उभ्या असलेल्या १९ वर्षीय तरुणाने पीडित मुलीला असभ्यरित्या स्पर्श केला. तसेच तिला चिमटा काढला. त्याचा जाब विचारला असता आरोपी तिच्यावर ओरडला. त्यामुळे ती घाबरून घरी जाऊ लागली. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलागही केला. अखेर मुलीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.