मुंबई : ताडदेवस्थित तुळशीवाडी येथील मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीतील मासळी बाजाराविरोधात स्थानिक रहिवाशांनी नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली. या बाजारामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीचा त्रास होत असून हा मासळी बाजार तातडीने बंद करावा, अशी मागणी रहिवाशांनी याचिकेद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे, भविष्यात या बाजाराचा पुन्हा त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्याचे आदेश महापालिकेला देण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेऊन महापालिकेला नोटीस बजावली व भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
तुळशीवाडी परिसरातील स्थानिक रहिवासी मेघा अग्रवाल, विक्रम जोगानी, लक्ष्मीचंद गाला व महेंद्र जैन यांनी एकत्रितपणे याप्रकरणी जनहित याचिका केली आहे. ताडदेवमधील महानगरपालिका इमारतीच्या तळमजल्यावरील मासळी बाजारात स्वच्छतेच्या नियमाचे पालन होत नाही. याशिवाय, परिसराला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्यांजवळ बाजारातील मासळीचे सांडपाणी अयोग्यरित्या उघड्यावर, थेट रस्त्यावर टाकले जाते. यामुळे, परिसरात दुर्गंधी आणि पाणी साचल्यामुळे डासांची समस्याही वाढली आहे. परिणामी, या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. या परिसरात हिंदू मंदिर आहे आणि जवळपास तीन जैन मंदिरे आहेत. या धार्मिक संस्थांपासून मासळी बाजार जवळ आहे. त्यामुळे, या मंदिरांना नियमितपणे भेट देणारे रहिवासी आणि भाविकांना या मासळी बाजारामुळे त्रास सहन करावा लागतो. या मासळी बाजारामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.
हा मासळी बाजार स्थापन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानग्या, परवाने, मान्यता किंवा इतर अधिकृत कागदपत्रांच्या मागणीसाठी शंभरहून अधिक माहिती अधिकार अर्ज महापालिकेकडे करण्यात आले. शंभरहून अधिक रहिवाशांनी वैयक्तिकरित्या आणि एकत्रितपणे महानगरपालिकेकडे या मासळी बाजारामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या सगळ्यांना प्रतिसाद दिला जाईपर्यंत मासळीची दुकाने बंद करावी, असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
मासळी बाजार बेकायदा
महानगरपालिकेची ही इमारत ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती व वापरात नाही. त्याचप्रमाणे, गेल्या तीन दशकांत या परिसरामध्ये १९ हून अधिक निवासी इमारती बांधण्यात आल्या आहेत. तथापि, ३० वर्षांनंतर वापरात नसलेल्या महापालिकेच्या इमारतीच्या तळमजल्यावर मासळी बाजार भरवण्यात येत आहे. यामुळे, स्थानिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. हा मासळी बाजार पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि त्यात स्वच्छता किंवा साठवणुकीशी संबंधित कायदेशीर नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नाही, असा आरोपही रहिवाशांनी याचिकेत केला आहे.
याचिकेतील मागण्या
मासळी ने-आण करण्याची निश्चित वेळ नाही. त्यासाठीच्या टॅक्सी, टेम्पो अरूंद गल्लीत सतत उभे केले जातात. त्यामुळे, परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. तसेच, या सगळ्या पाश्वभूमीवर याचिका प्रलंबित असेपर्यंत मासळी बाजार बंद करावा. या ठिकाणी कचरा व्यवस्थापनाची योग्य व्यवस्था करावी. अतिरिक्त मासे विक्री बंद करावी. उघड्य़ावर मासे विक्रीस मज्जाव करावा, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.