अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तौते चक्रीवादळ (Tauktee Cyclone) तयार झालं असून ते महाराष्ट्राच्या किनारी भागाला समांतर असा प्रवास करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या किनारी भागांमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणेच मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर देखील या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू शकतो. त्यादृष्टीने मुंबई महानगर पालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्या आहेत. “मुंबई महानगर पालिकेचे पूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. योग्य त्या सर्व उपाययोजना करून ठेवल्या आहेत”, असं महापौर म्हणाल्या. चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लसीकरण पुढचे दोन दिवस बंद राहणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

झाडांची छाटणी, वीजप्रवाह खंडित!

तौते चक्रीवादळाचा मुंबईत प्रभाव जाणवल्यास त्यासाठीच्या पूर्व उपाययोजना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. यामध्ये “समुद्र किनाऱ्यांलगतच्या जागा निर्मनुष्य केल्या आहेत. एनडीआरएफ, नेव्ही, अग्निशमनच्या टीम तिथे पोहोचल्या आहेत. आसपासच्या परिसरातील ३८४हून अधिक झाडांची छाटणी केली आहे. स्वत: आयुक्त, मुख्यमंत्री यांच्या काल बैठका झाल्या आहेत. आपण वादळाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. कदाचित या वादळाचा तडाखा मुंबईला बसणारच नाही. ते वादळ मुंबईकडे आलंच, तर सौम्य होऊन येईल. पण ज्या ठिकाणी पाणी शिरू शकतं, तिथे पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईच्या सहा चौपाट्यांवर आपातकालीन मदत पथके तैनात करण्यात आली आहेत. विजेच्या तारांचा प्रवाह देखील खंडित केला आहे”, अशी माहिती महापौरांनी दिली.

तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं; महाराष्ट्रावर कुठे आणि काय होणार परिणाम?

सी-लिंक दोन दिवस बंद!

दरम्यान, चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक पुढचे दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार असल्याचं देखील महापौरांनी सांगितलं. तसेच, बीकेसी, दहिसर अशा ठिकाणी असणाऱ्या कोविड केअर सेंटर्समधल्या रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवता येईल का? याची चाचपणी सुरू असल्याचं देखील त्या म्हणाल्या.

कुठे काय होणार परिणाम?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी आणि तीव्र वादळ असणार आहे. रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशार देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटक्षेत्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातही तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.