मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने २ ते १२ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आलेले वरिष्ठ-निवड श्रेणी प्रशिक्षण शिक्षकांनी पूर्ण केले. सर्व शिक्षकांनी वेळेत संशोधन अहवाल व स्वाध्याय वही सादरही केली. यानंतर तब्बल एक महिना उलटला तरी अद्याप शिक्षकांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. यामुळे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी मिळण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. जूनमध्ये झालेल्या या प्रशिक्षणाच्या पहिल्या दोन्ही दिवशी आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. हा त्रास सहन करूनही अनेक शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण करून महिना उलटला तरी अद्याप परिषदेकडून शिक्षकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आलेले नाही. या विलंबामुळे शिक्षकांच्या सेवाविषयक प्रगतीला व वेतन उन्नती प्रक्रियेला थेट अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशिक्षणातील सर्व टप्पे पूर्ण केले असतानाही प्रमाणपत्र न देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. शिक्षकांच्या वेतन उन्नतीसाठी हे प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. शासनाने तातडीने प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुंबई उत्तर विभाग संघटक उर्मेश पटेल यांनी केली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या सेवाविषयक प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष करणे योग्य नाही. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे तानाजी कांबळे यांनी निवेदनाद्वारे परिषदेकडे केली आहे.