वातानुकूलित डबा, आरामदायी आसन, काचेच्या खिडक्या आणि छत यासह वैशिष्ट्यपूर्ण असलेला विस्टाडोम डबा (पारदर्शक डबा) आता सीएसएमटी-करमाळी-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसलाही जोडण्यात येणार आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून विस्टाडोम डबा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. त्याचे आरक्षण १४ सप्टेंबरपासून करता येईल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस आणि मुंबई – मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम डबा जोडण्यात आला आहे. एका डब्याची प्रवासी क्षमता ४० इतकी आहे. काचेचे छत असलेल्या या डब्यांना गेल्या तीन-चार वर्षांमध्ये प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकण मार्गांवर धावणाऱ्या मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला २०१८ मध्ये पहिल्यांदा विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता. या डब्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन २६ जून २०२१ रोजी मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्येही विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता. प्रवाशांच्या मागणीनंतर मुंबई – पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनलाही १५ ऑगस्ट २०२१ पासून हा डबा जोडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, उत्तम आसन व्यवस्था, जीपीएसआधारित माहिती प्रणाली, एलईडी स्क्रिन आदी अनेक सुविधांचा त्यात समावेश आहे.

हेही वाचा : मुंबई : कोकणात जाणाऱ्या ‘डबल डेकर’ची ओळख काळाच्या पडद्याआड

आता गाडी क्रमांक २२११९ आणि २२१२० सीएसएमटी-करमाळी-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसलाही विस्टाडोम डबा जोडण्यात आला असून बुधवार, १४सप्टेंबरपासून त्याचे तिकीट प्रवाशांना काढता येईल. १५ सप्टेंबरपासून हा डबा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. दरम्यान, १ नोव्हेंबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेस करमाळीऐवजी मडगावपर्यंत धावणार आहे. मुंबई – मडगावदरम्यान ही गाडी प्रत्येक मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार धावेल आणि मडगांवहून ही गाडी याच दिवशी सुटेल, असे कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejas express will run with second vistadome coaches kokan route mumbai print news tmb 01
First published on: 13-09-2022 at 16:06 IST