लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यात उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मुंबईत तुलनेने तापमान जरी कमी असले तरी सोमवारपासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढचे दोन ते तीन दिवस मुंबईकरांना उकाड्याबरोबरच उन्हाचा तडाखाही सहन करावा लागणार आहे.

मुंबईत सध्या कमाल तापमान ३२ ते ३३ अंशादरम्यान आहे. मात्र वाढती आर्द्रता आणि दमट हवामान यांमुळे उष्मा अधिक जाणवत आहे. दिवसभराचे तापमान कमी असल्यामुळे मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तडाख्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आता पुन्हा उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून साधारण बुधवारपर्यंत मुंबईच्या तापमानाचा पारा चढा राहणार आहे. त्यामुळे उकाडा आणि उन्हाचा ताप नागरिकांना सहन करावा लागणार आहे. या दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे.

नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव आदी शहरांत ४० अंशांचा पुढे तापमान नोंदले आहे. शनिवारी नागपूर येथे सर्वाधिक ४४.७ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. या तापमानासह नागपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. राजस्थानमधील उष्ण वारे गुजरातवरुन राज्यात येत आहेत. याचाच परिणाम म्हणून पुढील चार पाच दिवस राज्याच्या तापमानात वाढ होणार आहे. मुंबईतही ही वाढ पहायला मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील दोन तीन दिवस असह्य उकाडा आणि उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय काळजी घ्यावी

  • दिवसा उष्णता असल्यास घराच्या खिडक्या आणि दरवाजे काही वेळापुरते बंद करावे. त्यामुळे उष्णता घरात येत नाही.
  • गडद रंगाचे पडदे वापरावे. त्यामुळे थेट सूर्यप्रकाश रोखला जाईल.
  • मायक्रोवेव्ह, स्टोव्ह आणि ड्रायर यांसारख्या उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर कमीत कमी करावा.
  • भरपूर पाणी प्या.
  • आवश्यकता असेल, तरच दुपारी बाहेर जा.
  • द्रवपदार्थांचे प्रमाण वाढवा.
  • तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
  • उघड्यावर ठेवलेल्या बर्फाचा वापर करून तयार केलेल्या पेयांचे सेवन करू नये.

उष्णतेचा त्रास झाल्यास काय करावे

  • संबंधित व्यक्तीला तातडीने थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये हलवावे.
  • शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.
  • पुरेसे पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रवपदार्थ द्या.

काय करु नये

  • उन्हात अती कष्टाची कामे करु नये.
  • दुपारी बारा ते तीन दरम्यान आवश्यक नसल्यास घराबाहेर जाणे टाळावे.
  • बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.

आज पावसाचा अंदाज कुठे

पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोलीत आणि यवतमाळ या भागात हवामान विभागाने आज पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.