मुंबईमध्ये जुन्या इमारतींना वाळवी लागण्याच्या प्रकारात वाढ झाली असून या इमारती धोकादायक बनू लागल्या आहेत. मात्र वाळवीपासून आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे कारण पुढे करून पालिकेने वाळवी प्रतिबंधक औषध फवारणीस चक्क नकार दिला आहे.
मुंबईमधील इमारतींना वाळवी लागल्यानंतर पालिकेकडून तेथे वाळवी प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात येत होती. मात्र २००३ पासून वाळवी प्रतिबंधक औषधाची फवारणी करणे पालिकेने बंद केले. सध्या मुंबईमधील अनेक इमारतींना वाळवी लागली आहे. त्यामुळे या इमारती धोकादायक बनू लागल्या असून रहिवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत. त्यामुळे पालिकेने या इमारतींमध्ये वाळवी प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी, अशी मागणी काँग्रेस नगरसेविका सुषमा साळुंखे यांनी केली होती. याबाबतची ठरावाची सूचना साळुंखे यांनी पालिका सभागृहात मांडली होती. ही ठरावाची सूचना सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजूर केल्यानंतर महापौर स्नेहल आंबेकर यांनी ती पुढील कारवाईसाठी पालिका आयुक्तांकडे पाठविली होती. या ठरावाच्या सूचनेवरील अहवाल प्रशासनाने सादर केला असून त्यात वाळवी प्रतिबंधक औषध फवारणीबाबत नकारघंटा वाजविण्यात आली आहे.
पूर्वी पालिकेकडून वाळवी प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात येत होती, अशी कबुली या अहवालात देण्यात आली आहे. मात्र ती तात्पुरत्या स्वरूपाची होती, असेही पुढे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2016 रोजी प्रकाशित
वाळवी प्रतिबंधक औषध फवारणीस पालिकेचा नकार
मुंबईमध्ये जुन्या इमारतींना वाळवी लागण्याच्या प्रकारात वाढ झाली असून या इमारती धोकादायक बनू लागल्या आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 15-04-2016 at 00:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Termite prevention drug spray bmc