देशातील वाढत्या महागाईवरून ठाकरे गटाने मोदी सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. आठ वर्षांपूर्वी महागाईच्या नावाने काँगेसविरोधात ठणाणा करीत जे सत्तेत बसले त्यांनीही दरवाढीची ‘वात’ आणि महागाईचे ‘दिवे’ लावण्याशिवाय दुसरे काय केले? असा प्रश्न ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारला आहे. तसेच महागाई वाढण्याला मोदी सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – “संजय राऊतांनी माझ्यासमोर दोघांना अश्लील…”, रामदास कदमांचा हल्लाबोल!

ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलंय?

“महागाई कमी झाल्याचे ढोल सत्ताधारी मंडळी येता-जाता पिटत असतात. त्यासाठी कधी कागदी घोडे, तर कधी कागदोपत्री आकडे नाचवीत असतात. अर्थात महागाईसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या मात्र सत्ताधाऱ्यांचे ढोल फोडणाऱ्या आणि कागदी घोड्यांना लगाम घालणाऱ्या आहेत. आता तर एका बातमीने महागाई कमी झाल्याच्या दाव्याची पोलखोलच केली आहे. ‘जगात महागाई कमी झाली असली तरी भारतात मात्र ती वाढली आहे,’ अशी ही बातमी आहे. या बातमीनुसार जानेवारीमध्ये जागतिक बाजारात महागाई दर कमी झाला असला तरी भारतात मात्र तो वाढला आहे. आता सत्ताधाऱ्यांचे काय म्हणणे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अर्थात, ते काहीही सांगत असले तरी वस्तुस्थिती या बातमीमध्ये जे सांगितले तशीच आहे”, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

पेट्रोल डिझेलच्या किंमतीवरून मोदी सरकारला केलं लक्ष्य

पुढे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवरूनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. “जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या तरी आपल्या देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढच होत असते. स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर ‘एक हजारी मनसबदार’ बनते तर पेट्रोल-डिझेल ‘शंभरी’ पार करते. मुळात देशांतर्गत इंधन दर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार कमी-जास्त होणे अपेक्षित आहे. मात्र मोदी सरकारच्या काळात हे ‘समीकरण’ही खुंटीला टांगून ठेवले गेले आहे”, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

“महगाईला केंद्र सरकारचं धोरण जबाबदार”

“सामान्यांचा खिसा रिकामा आणि सरकारी तिजोरी ‘पेट्रोडॉलर्स’ने भरलेली, याला मोदी सरकार ‘अर्थशास्त्र’ म्हणत असले तरी सर्वसामान्यांसाठी ते ‘अनर्थशास्त्र’च ठरले आहे. एरव्ही महागाईबाबत आपले राज्यकर्ते युक्रेन युद्धाकडे बोट दाखवतात. हे युद्ध तर सुरूच आहे. तरीही जगातील महागाई कशी कमी झाली? म्हणजेच आपल्याकडील महागाईचा युक्रेन युद्धाशी फारसा संबंध नाही. जो संबंध आहे तो केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा आहे. जगात महागाई, तेव्हा आपल्याकडेही महागाई; पण जगात स्वस्ताई तरीही आपल्याकडे महागाईच, ही मोदी राजवटीचीच ‘देणगी’ म्हणायला हवी”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “भाजपाने टिळक कुटुंबाला वापरून फेकलं, आजारी गिरीश बापटांना प्रचारात उतरवणं हा तर..” उद्धव ठाकरेंची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांनी महागाईचे ‘दिवे’ लावण्याशिवाय दुसरे काय केले?”

“आठ वर्षांपूर्वी महागाईच्या नावाने काँगेसविरोधात ठणाणा करीत जे सत्तेत बसले त्यांनीही दरवाढीची ‘वात’ आणि महागाईचे ‘दिवे’ लावण्याशिवाय दुसरे काय केले? वादे आणि दावे तर खूप केले, पण जनतेच्या नशिबी ना स्वस्ताई ना दुहाई, लादली ती फक्त महागाईच, ‘मोदीनॉमिक्स’चे ढोल जगभर पिटणारा सत्ताधारी पक्ष आणि अंधभक्त यांचे या ‘जगात स्वस्ताई, भारतात महागाई’ या उफराट्या समीकरणावर काय म्हणणे आहे? महागाईचा असाही ‘चमत्कार’ फक्त मोदीच करू शकतात असेच कदाचित ते म्हणतील आणि स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतील”, अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.