बदलापूर : राज्याच्या विधान भवनात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत गोवंश हत्या बंदी आणि गोमांस विक्रीच्या प्रकरणांवर कारवाईची मागणी होताच बदलापूर शहरात काही तासात ७ अवैध कत्तलाखान्यांवर कारवाई करत ते जमिनदोस्त केले. कुळगाव बदलापूर नगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ही कारवाई झाली. हे ७ कत्तलखाने पोलिसांनी शोधून काढले होते. गेल्या काही महिन्यात बदलापूर शहरातून अवैधरित्या गोमांसाची विक्री आणि वाहतूक केली जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मगणी होत होती.
गेल्या काही महिन्यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गोमांस विक्री, वाहतूक केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. बदलापूर गावातून गोमांस घेऊन ते विक्रीसाठी मुंब्रा येथे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला सतर्क प्रवाशाने पोलिसांना पकडून दिले होते. त्यामुळे बदलापूर गावातून गोमांसाची विक्री केली जात असल्याचा संशय बळावला होता. काही दिवसांपूर्वी बजरंग दल या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर गावाशेजारी असलेल्या ग्रामीण भागात गोवंशांच मृत अवशेष टाकल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तर अंबरनाथ शहरातही अशाच प्रकारे गोमांस विक्री सुरू असल्याचे समोर आले होते.
या घटनांनंतर अशा अवैध कत्तल खान्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून या कत्तल खान्यांचा शोध घेतला जात होता. बदलापूर गाव आणि नगरपालिका क्षेत्राच्या वेशीवर असे ७ कत्तल खाने असल्याचे दिसून आले होते. गोवंश हत्या, अवैध कत्तलखाने आणि गोमांस विक्रीचा विषय गुरूवारी पावसाळी अधिवेशनातही गाजला. अतुल भातखळकर यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करत सरकार कारवाई करणार आहे का असे विचारले. त्यावर बोलताना गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी अशा कत्तलखान्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. त्याच्या काही तासातच कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात असलेल्या बदलापूर गावात पालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास बदलापूर गावातील ७ अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर चालवून बांधकाम तोडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर पालिकेने बदलापूर गावातील ५ तर वेशीवरच्या २ कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली आहे.
पोलिस आणि पालिकेच्या धडक कारवाईनंतर बदलापूर गाव आणि ग्रामीण भागाच्या वेशीवर सुरू असलेल्या या कत्तलखान्यांवर नियंत्रण मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पोलीस प्रशासन यातील आरोपींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सामुहिक गुन्हेगारीची कलमे त्यांच्यावर लावता येतील का, याचाही पोलीस अंदाज घेत आहेत.