दळण आणि ‘वळण’ : नवा प्रकल्प.. नवीन रखडपट्टी

ठाणे-दिवा यांदरम्यानचा पाचवा-सहावा मार्ग तातडीने पूर्ण होणे अपेक्षित आहे.

thane diva rail-rout
ठाणे-दिवा या दोन स्थानकांदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम जोरात सुरू

ठाणे-दिवा या दोन स्थानकांदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम जोरात सुरू असल्याचा दावा मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे केला जातो. हा प्रकल्प डिसेंबर २०१७पर्यंत पूर्ण होईल, असेही सांगितले जात आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामांची गती पाहता पुढील तीन वर्षे तरी हा प्रकल्प पूर्ण होणार नाही, असा दावा प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि अभ्यासक करत आहेत. काय आहे नेमकी वस्तुस्थिती..?

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गाची क्षमता कधीच संपलेली आहे, असे बोलले जाते. ते खरेही आहे. मध्य रेल्वेवर तर सध्या १६८० पेक्षा जास्त सेवा चालवल्या जातात आणि या चालवण्यासाठी मुख्य मार्गावर फक्त चार मार्गिका उपलब्ध आहेत. या चार मार्गिकांवरून लोकल सेवेबरोबरच लांबपल्लय़ाच्या गाडय़ाही धावतात. या सगळ्या सरमिसळीमुळे मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक अत्यंत जटिल मानली जाते. ही वाहतूक अधिक सोयीची व्हावी, अधिक वेगवान व्हावी, अधिक फेऱ्या असाव्यात यासाठी अनेक मोठी कामे करणे गरजेचे आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प एमयूटीपी-२ या योजनेअंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हाती घेतला. हा प्रकल्प म्हणजे कल्याण ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यांदरम्यान दोन नव्या मार्गिकांची उभारणी!

हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यापैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ला यांदरम्यान या दोन नव्या मार्गिका कार्यरत झाल्या आहेत. ही वस्तुस्थिती असली, तरी ठाणे ते कुर्ला यांदरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेमुळे कुर्ला ते ठाणे यांदरम्यानच्या लोकल वाहतुकीला होणारा फायदा वगळता तसा थेट फायदा उपनगरीय प्रवाशांना मिळालेला नाही. वास्तविक पाचवी-सहावी मार्गिका ठाणे ते कुर्ला यांदरम्यान पूर्ण झालेली नाही. ती विद्याविहापर्यंतच पूर्ण झाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या लांबपल्लय़ाच्या गाडय़ा विद्याविहारजवळ मुख्य मार्गावर येतात. तेथपासून ठाण्यापर्यंत या गाडय़ा पाचव्या-सहाव्या मार्गिकेवरून धावतात. ठाण्यापुढे मात्र या गाडय़ा पुन्हा मुख्य मार्गावरील तिसऱ्या-चौथ्या मार्गावरच येतात आणि लोकलची वाट अडवतात.

ठाण्याजवळ तयार होणारी ही कोंडी फोडण्यासाठी ठाणे-दिवा यांदरम्यानचा पाचवा-सहावा मार्ग तातडीने पूर्ण होणे अपेक्षित आहे. आता ही गोष्ट रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ल्क्षात येत नाही का? तर येते! पण या प्रकल्पाचे पूर्ण होणे रेल्वे अधिकाऱ्यांच्याही हातात नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी कितीही तत्परतेने काम केले, तरीही हे काम स्थानिकांच्या पाठिंब्याशिवाय पूर्ण होणार नाही. आणि या प्रकल्पाची माशी नेमकी तिथेच शिंकते.

प्रवाशांचे प्रश्न हिरिरीने प्रशासनासमोर मांडणाऱ्या अनेक रेल्वे प्रवासी संघटना आज कार्यरत आहेत. या प्रवासी संघटनांचा मिळून एक उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघ नावाचा महासंघही आहे. या महासंघाचे एक सदस्य जोगदेव हे माजी रेल्वे कर्मचारी! कोकण रेल्वेच्या काश्मीरमधील प्रकल्पांसाठीही त्यांनी काम सांभाळले आहे. या जोगदेव यांच्या मते हा प्रकल्प पुढील तीन वर्षे पूर्ण होणाऱ्यातला नाही. दुसऱ्या बाजूला मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांच्या मते हा प्रकल्प डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होणारच! हे मत सहाय यांनी अनेकदा ठासून मांडले आहे. प्रकल्प लोकांच्या सेवेत कधी येईल याची कल्पना नाही, पण तो डिसेंबर २०१७मध्ये पूर्ण होणार, असे सहाय यांचे मत!

या दोन परस्परविरोधी मतांचा मागोवा घेण्यासाठी प्रत्यक्ष ठाणे ते दिवा यांदरम्यान प्रकल्पाचे काम चालू असलेल्या ठिकाणी जाण्याचा योग आला. ठाणे स्थानकाच्या पष्टिद्धr(१५५) मेला ठाणे कॉलेजच्या दिशेने या दोन नव्या मार्गिका उभ्या राहणार आहेत. पुढे कळवा स्थानकाच्या पूर्वेकडे या मार्गिका जातील. कळवा ते मुंब्रा यांदरम्यान छोटय़ा पारसिक बोगद्याजवळ एक नवा बोगदाही तयार करण्यात आला आहे. या बोगद्यात अद्याप रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम झाले नसले, तरी बोगदा तयार होणे हेदेखील मोठे यश आहे. त्यापुढे मुंब्रा स्थानकाच्या अलीकडे मुंब्रा खाडीजवळ एक बोगदा सध्या धीम्या मार्गावर आहे. त्या बोगद्याच्या बाजूला एक नवीन बोगदा बांधण्याचे काम सुरू झाले आहे. हा बोगदा बांधण्यासाठी अस्तित्वात असलेला रस्ता खाडीच्या बाजूला सरकवावा लागणार आहे. त्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मुंब्रा स्थानकाजवळ या दोन्ही मार्गिका पुन्हा पश्चिम दिशेला येणार आहेत.

या प्रकल्पाच्या मार्गावरून चालताना अनेक गोष्टी लक्षात येतात. ठाण्याहून कळव्याकडे जाताना कळवा खाडीवर या प्रकल्पासाठी नवीन पूल बांधण्याचे काम झाले आहे. पण त्या पुढे कळवा स्थानकाजवळ आल्यावर पूर्वेकडे असलेली बांधकामे हटवण्याचे काम करणे रेल्वेला जड जाणार आहे. कळवा ते खारेगाव यांदरम्यान रेल्वेकडे जागा उपलब्ध आहे. खारेगाव येथील रेल्वे फाटकाच्या पुढे नव्याने तयार केलेला बोगदाही आरामात ओलांडला जाऊ  शकतो. पण त्या पुढे खाडीला समांतर असलेल्या मार्गाच्या पूर्वेकडे एक झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी या प्रकल्पातील सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. रेल्वे अधिकारी या झोपडय़ा तोडण्याचे काम करण्यासाठी किंवा या प्रकल्पाचे कोणतेही काम करण्यासाठी या भागात गेल्यावर त्यांना स्थानिकांच्या प्रखर विरोधाला तोंड द्यवे लागते. रेल्वेच्या अभियंत्याला येथील काही महिलांनी पिटाळून लावल्याचे मध्य रेल्वेच्या एका बडय़ा अधिकाऱ्याने सहज म्हणून गप्पा मारताना सांगितले होते.

सध्या या दोन मार्गिका टाकण्यासाठी आवश्यक असलेले जमीन सपाट करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान सात ते आठ महिने लागतील. त्यानंतर या जमिनीवर रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम हाती घेण्यात येईल आणि त्याच वेळी ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आदींची कामे होतील. या प्रकल्पातील आणखी मोठे काम म्हणजे कट-कनेक्शनचे काम! या प्रकल्पात तब्बल नऊ  ठिकाणी कट-कनेक्शनची कामे करावी लागणार आहेत. दिवा येथे चार ठिकाणी कराव्या लागणाऱ्या कामांसाठी चार ते पाच महा-मेगाब्लॉक घ्यावे लागले होते. त्यावरून या कामाची व्याप्ती सहज लक्षात यावी.

ही सर्व परिस्थिती चांगली दोन-तीन वेळा फिरून प्रत्यक्ष पाहिल्यानंतर प्रवासी संघटनांचे तीन वर्षांचेच भाकीत खरे होणार की काय, अशी शंका येते. तसे झाल्यास मध्य रेल्वेच्या ठाण्यापल्याडच्या प्रवाशांच्या यातनांना किमान तीन वर्षे तरी अंत नाही, हे नक्की! आणि तीन वर्षांनी हा प्रकल्प अस्तित्वात आला, तरी तोपर्यंत या मार्गावर वाढलेल्या प्रवासी संख्येसाठी तो पुरेसा ठरेल का, हादेखील प्रश्न अनुत्तरित आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडे या प्रश्नांचे उत्तर म्हणून आणखी एक तेवढाच मोठा प्रकल्प कागदावर तयार असेलच! असो, तूर्तास डिसेंबर २०१७ या कालमर्यादेकडे प्रवाशांचे डोळे लागले आहेत. घोडामैदान दूर नाही!

रोहन टिल्लू @rohantillu

tohan.tillu@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane diva fifth and sixth railway lines will ready in three year

ताज्या बातम्या