मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गायमुख ते फाऊंटन हाॅटेल नाका, वसई बोगदा आणि फाऊंटन हाॅटेल नाका, वसई ते भाईंदर उन्नत रस्ता प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया नुकतीच रद्द केली. आता या प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत. या निविदा काढण्यासाठी एमएमआरडीएने थेट एल. ॲण्ड टी. कंपनीकडे त्यांच्या आर्थिक निविदेचा तपशील मागितला आहे. यासाठी एल. ॲण्ड टी.ला पत्र पाठवून सात दिवसांत संबंधित तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाण्यातील घोडबंदर येथील वाहतूक कोंडी दूर करून ठाणे – वसई – भाईंदर अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने गायमुख ते फाऊंटन हाॅटेल नाका बोगदा ते फाऊंटन हाॅटेल नाका ते भाईंदर उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. अंदाजे १५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार तांत्रिक निविदा खुल्या केल्या असता पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. मात्र निविदा छाननीत एल. ॲण्ड टी. कंपनी अपात्र ठरली आणि त्यानंतर कंपनीने थेट एमएमआरडीएच्या निविदेवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने एमएमआरडीएच्या बाजूने निकाल दिल्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, सार्वजनिक हित आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने या प्रकल्पाची निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्याची तयारी एमएमआरडीएने दर्शवत याबाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. यानंतर न्यायालयाने एमएमआरडीएची निविदा प्रक्रिया वैध ठरवत एल. ॲण्ड टी.ची याचिका निकाली काढली, असा दावा एमएमआरडीएने केला. मात्र चालू निविदा प्रक्रिया मात्र रद्द झाली. महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान एल. ॲण्ड टी.ने आपली निविदा इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा लक्षणीय कमी असल्याचा दावा केला होता. ती अंदाजे ३००० कोटी रुपयांनी कमी असल्याचा हा दावा होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर आता एमएमआरडीएने थेट एल. ॲण्ड टी.ला पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार सर्वोच्च न्यायालयात एल. ॲण्ड टी.ने नमूद केलेल्या आर्थिक निविदांचे मूळ कागदपत्रे, दरविवेचन, गणना पत्रके आणि स्पष्टीकरणात्मक टिपण्या सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश कंपनीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. एल. ॲण्ड टी.ची कागदपत्रे अधिकृत अभिलेखांचा भाग होतील आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील, नव्याने निविदा काढण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे म्हणत एमएमआरडीएने एल. ॲण्ड टी.कडून कागदपत्रांची मागणी केली आहे.