बलात्काराप्रकरणी १२ वर्षांची शिक्षा भोगून आलेल्या सराईत आरोपीने चेंबूर येथे ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार बुधवारी घडला. आरोपीने धमकावून पीडित मुलीला इमारतीच्या छतावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीने काही महिन्यांपूर्वी देवनार पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. तसेच २००९ मध्ये कळंबोली येथेही अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याने १२ वर्ष शिक्षा भोगली होती. तुरुंगातून सुटल्यावर त्याने पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- दिवाळीपूर्वी मुंबईत मोठी कारवाई; २३ लाख ७४ हजारांची भेसळयुक्त मिठाई जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिला अडवले. या परिसरातील एक मुलगी बेपत्ता असून तिचा शोध घेण्यासाठी माझी मदत कर नाहीतर तुला जीवे मारीन, असे धमकावले. त्यानंतर आरोपी तिला जवळच्या इमारतीच्या छतावर नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी एक व्यक्ती छतावर आली. त्याला पाहून थोरात तेथून पळू लागला. त्यावेळी छतावर आलेल्या व्यक्तीने चोर समजून आरडाओरडा केला. त्यानंतर इमारतीतील नागरिकांनी आरोपीला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा- २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलिसांनी आरोपीची पार्श्वभूमी तपासली असता त्याने यापूर्वी कळंबोली येथे १४ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यावेळी तो १९ वर्षाचा होता. याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवून १२ वर्षांची शिक्षा सुनावली होती. १२ वर्षांची शिक्षा भोगून काही महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने देवनार येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. पण स्थानिकांनी पकडून त्याला बेदम मारहाण केली. त्याप्रकरणी त्याला जामीन मिळाल्यानंतर पाच दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर आरोपीने पुन्हा बुधवारी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून गुरूवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.