मुंबई : ‘तुम से तुम तक’ या नवीन मालिकेसाठी एका मनोरंजन वाहिनीविरूद्ध बनावट तक्रार दाखल केल्याचे निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाने तक्रारकर्त्यांनाच जे जे रुग्णालयात साफसफाई आणि कपडे धुण्याचे काम करण्याचे आदेश दिले.

‘तुम से तुम तक’ या न मालिकेप्रकरणी वाहिनीविरूद्ध दाखल केलेली बनावट तक्रार रद्द करण्यासाठी झी टीव्हीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, तक्रारदाराच्या वर्तनावर खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. सुरूवातीला तक्रारकर्त्याने सायबर पोलिसांना त्याचे नाव सुनील शर्मा सांगितले होते. तथापि, गेल्या महिन्यात न्यायालयासमोर उपस्थित झाल्यानंतर त्याने त्याचे नाव सुनील महेंद्र शर्मा असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या आधार कार्ड, पॅनकार्डसह अन्य कागदपत्रांवर त्याचे नाव महेंद्र संजय शर्मा असे नमूद करण्यात आल्याची न्यायालयाने त्याला समुदाय सेवेचे आदेश देताना प्रामुख्याने दखल घेतली.

ही तक्रार केवळ समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या बातम्या आणि त्यावरील मतांवर आधारित होती. खोट्या, एकतर्फी बातम्यांवर अशी चुकीची तक्रार दाखल करण्याबाबत तक्रारदाराने दिलेल्या स्पष्टीकरणावर खंडपीठाने आपली नाराजी नोंदवली. तसेच, हे कृत्य कदाचित एखाद्या प्रतिस्पर्ध्याच्या इशाऱ्यावर केल्याचे दिसून येते. या पैलूची पोलिसांनी चौकशी करावी, असे स्पष्ट करताना खंडपीठाने शर्मा यालाजे. जे. रुग्णालयात १५ दिवसांसाठी सामुदायिक सेवा करण्याचे आदेश दिले.

आदेश नेमका काय ?

शर्मा याने रुग्णालयात दररोज तीन तास (सोमवार ते शुक्रवार) सेवा करावी, त्यामध्ये फरशी साफ करणे किंवा रुग्णालय प्रशासनाने नेमून दिलेल्या कामांचा समावेश असेल, असे आदेश खंडपीठाने दिले. या आदेशानुसार शर्मा याने कर्तव्ये पार पाडली नाहीत, तर त्याच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी करावाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.