मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी महापालिकेने गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश दिले होते. मात्र मूर्तीवर अशा खुणा करण्यास भाजपने कडाडून विरोध केला आहे. गणेशोत्सव हा लाखो भाविकांच्या आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून कळवले होते. दरम्यान, हा निर्णय आधीच रद्द करण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घालण्याच्या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याकरीता महानगरपालिकेने घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या किंवा पर्यावरणपूरक साहित्यापासून साकारण्याचे निर्देश दिले होते. तसेच पर्यावरणपूरक व शाडूच्या मातीची मूर्तीतील फरक कळावा म्हणून मूर्तीच्या मागे उजव्या खांद्यावर हिरव्या रंगाचे वर्तुळ आणि ‘पीओपी’ची असल्यास लाल रंगाच्या वर्तुळाची खूण करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने मूर्तिकारांना दिले होते. तसेच याबाबत वर्तमानपत्रात जाहिरात देऊन जनजागृतीही करण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
गणेशोत्सव आस्थेचा विषय आहे, मुंबईत या उत्सवाचे विशेष महत्त्व आहे, प्रत्येक व्यक्ती गणेशाची मनोभावे पूजा करते. त्यामुळे उत्सवकाळात कोणाच्याही श्रद्धेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर मूर्तींवर शिक्का मारणे किंवा रंग देणे योग्य नाही. यामुळे भिवकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी मूर्तीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी किंवा शिक्केबाजी करू नये, त्याऐवजी दुसरा पर्याय शोधावा, असे निर्देशही लोढा यांनी दिले आहेत.गणेशोत्सव समन्वय समितीनेही गणेशमूर्तीवर खुणा करण्यास विरोध केला होता. आमच्या मागणीला प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला निर्देश दिल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
हेही वाचा >>>एक्सप्रेस अड्डामध्ये करीना कपूर खानशी खास गप्पा!
दरम्यान, हा निर्णय आधीच रद्द करण्यात आला आहे. यंदा गणेशोत्सवासाठी प्रशासनाने सुरुवातीलाच आयोजित केलेल्या समन्वय बैठकीत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीं ओळखीसाठी खूणा करण्याचा विषय चर्चेला आला होता. मात्र गणेशमूर्तींवर शिक्का मारू नये, अशी सूचना प्रशासनाने याच बैठकीत मूर्तीकारांना केली होती, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाने हा निर्णय आधच रद्द केला होता, तर त्याबाबत मूर्तिकार किंवा समन्वय समितीला का कळवले नाही, असा सवाल ॲड. दहिबावकर यांनी केला आहे.