मुंबई: आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसानी केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आंदोलकांच्या भावनेची कदर करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून आंदोलकांनी राज्यात कोठेही कायदा हातात घेऊ नये. जाळपोळ, हिंसाचार याला खतपाणी घालू नये. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत या प्रश्नी चर्चा करून तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या मराठी समाजबांधवांवर पोलिसांकडून लाठीमार, हवेतील गोळीबार केला गेला. या घटनेबाबत मराठा बांधवांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या काही भागांत गाडय़ांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत आहेत. त्या तातडीने थांबविण्याची गरज आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचे नुकसान होत आहे.

हेही वाचा >>> Jalna Lathi Charge: सरकारच्या आदेशानेच जालन्यात लाठीमार नाना पटोले यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेक, जाळपोळ यांसारख्या घटना टाळाव्यात, असे आवाहनही यानिमित्ताने उपमुख्यमंत्री पवार यांनी मराठा बांधवांना केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर तसेच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारची तयारी आहे. राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे पवार यांनी म्हटले आहे.