मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक लवकरच अपेक्षित असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन, कौशल्य विकास, उद्योजकता, महिला आणि बाल विकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला नुकतीच भेट दिली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन लोढा यांना महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांची कामे, नागरी सुविधांचा आढावा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विरार-डहाणू चौपदरीकरणासाठी २४ हजार खारफुटींवर कुऱ्हाड ; एमआरव्हीसीची उच्च न्यायालयात याचिका

काही दिवसांपूर्वीच मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर लोढा यांनी महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी आयोजित बैठकीत इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी विविध प्रकल्प आणि नागरी कामांची माहिती लोढा यांना दिली. महानगरपालिकेच्या विविध कामांसाठी राज्य सरकारबरोबर समन्वय साधण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश लोढा यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा >>> पनवेल : रात्रीच्या काळोखात चोरट्याविरोधात ‘ती’ दुर्गेप्रमाणे लढली

या बैठकीला भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, भाजप आमदार राजहंस सिंह, विद्या ठाकूर, डॉ. भारती लव्हेकर, ॲड. पराग अळवणी, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट आणि विनोद मिश्रा आदी या बैठकीला उपस्थित होते. मुंबईतील रस्ते व पुलांची विकास कामे, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठा, मलजल प्रक्रिया केंद्रे इत्यादींबाबत माहिती यावेळी लोढा यांना देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The guardian minister of suburban district reviewed the development works of mumbai municipal corporation mumbai print news amy
First published on: 05-10-2022 at 15:37 IST