मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहातील प्राणवायू पुरवठ्यामध्ये वेळोवेळी येणारा अडथळा लक्षात घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने पहिल्या टप्प्यात शहर व पूर्व उपनगरातील प्रसूतीगृहातील प्राणवायू पुरवठा यंत्रणा सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नवीन वाहिनी टाकण्यासह अन्य दुरुस्तीची कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेची २७ प्रसुतीगृहे व एक माता बाल रुग्णालय मागाठाणे येथे आहे. त्यापैकी ओशिवरा, मरोळ, सावित्रीबाई फुले भांडुप, डॉ. आनंदीबाई जोशी कुर्ला या प्रसुतीगृहांचा सेंटिनल सेंटर म्हणून विकास करण्याबरोबरच तेथे विशेष नवजात शिशु विभाग सुरू करण्यात आला आहे. सर्व प्रसुतीगृहातील सेवांचा दर्जा व कामगिरी सुधारण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत परिचारिका, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ, औषध निर्माता, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा… तळीयेतील ६६ बाधित कुटुंबांची हक्काच्या घराची प्रतीक्षा अखेर संपणार

एकीकडे प्रसुतीगृहात सुधारणा होत असताना दुसरीकडे प्राणवायू पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. त्याबाबत अनेक तक्रारी रुग्णांसह प्रसूतीगृहाच्या व्यवस्थापकाने महापालिकेकडे केल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसुतीगृहातील प्राणवायू पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा… मुंबईः सात वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर व पूर्व उपनगरातील प्रसूतीगृहातील प्राणवायू पुरवठा यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यात वैद्यकीय गॅस पाईपलाईन सिस्टमसह ऑक्सिजन साधनांची दुरुस्ती व नवीन ऑक्सिजन पुरवठा वाहिनी टाकणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. त्याशिवाय स्मार्ट नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डिंगची तरतूदही करण्यात येणार आहे. महिन्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.