“लोकांसाठी लढणा-या आणि कणखरपणे उभे राहणा-या पूज्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना वंदन करतो,” असे ट्विट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केलेल्या ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे गुणगाण करत बाळासाहेबांचे कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणादायी राहिल, असे म्हटले आहे.

भाजप आणि शिवसेनेमध्ये राज्यात एकत्र निवडणूक लढण्यापासून ते सरकार स्थापण्यापर्यंत अनेक खटके उडाले आहेत. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेने भाजप नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली की बिल्ली, अफझलखानाची फौज असे म्हणत कुरखोडी केली होती. पण, प्रचाराच्या सुरुवातीलाच शिवसेनेवर टीका करणार नाही असे भाजपने जाहीर केले होते. मात्र, मोदी टिकेमुळे अस्वस्थ झालेल्या भाजपने शिवसेनेच्या या टीकेचा वचपा निवडणूक निकालानंतर काढत शिवसेनेला सोबत घेण्याच्या निर्णयास अधांतरी ठेवले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे वरील ट्विट शिवसेना आणि भाजप यांना पुन्हा जवळ आणणारे ठरू शकते.