मुंबई : दादर पूर्व परिसरातील सराफ कंपनीच्या व्यवस्थापकाला सहा जणांनी मारहाण करून त्याच्याकडील २७ लाखांचा मुद्देमाल लुटून नेला. आरोपींनी व्यवस्थापक प्रवास करीत असलेली टॅक्सी थांबवून त्याला लुटण्यात आले असून याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी सहा अनोळखी व्यक्तींविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

लोअर परळ परिसरातील सन मिल कम्पाऊंडमध्ये वास्तव्यास असलेले बलरामकुमार पोलेंद्र सिंह (२६) व्यवस्थापक म्हणून बी.एम. ज्वेलर्स कंपनीत काम करतात. सिंह सहकारी सोमेन सैकती व तौफिक मुल्ला यांच्यासोबत सोमवारी दादर रेल्वेस्थानक येथून लोअर परळ परिसरात जात होते. त्यावेळी रामी हॉटेलजवळ सहा व्यक्तींनी त्यांची टॅक्सी अडवली व त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांच्याकडील लाल रंगाच्या बॅगेमधील ३५ किलो कास्टींग गोल्ड व गोल्ड फायलिंग (६५० ग्रॅम) असा सुमारे २७ लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपींनी तेथून पलायन केले.

हेही वाचा – मुंबई : अक्सा समुद्रकिनाऱ्यावरील समुद्री भिंतीच्या बांधकामाला स्थगिती

हेही वाचा – मुंबई : दुर्दशा झालेल्या उद्यानाच्या डागडुजीला सुरुवात, कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबतची माहिती सिंहने कंपनीच्या मालकांना दिल्यानंतर स्थानिक माटुंगा पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. सिंह याच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी दरोडा व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून संशयीतांचा शोध सुरू आहे. आरोपींना सिंह यांच्याकडे असलेल्या मुद्देमालाची माहिती होती. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीने याबाबतची माहिती आरोपींना दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिसही समांतर तपास करीत आहेत.