मुंबई: मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. मला समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही देतानाच आंदोलनाच्या आगीवर स्वत:च्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजू पाहणाऱ्यांपासून सावध राहा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मराठा समाजाला केले. जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली गावात मराठा समाजावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी एका चित्रफितीच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना मराठा समाजाने वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन केले.

कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन करताना सरकार त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. तसेच राज्यात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या व आता विरोधात असलेल्या नेत्यांनीसुद्धा अशा प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचे काम करू नये, असा टोला त्यांनी नाव न घेता शरद पवार यांना लगावला. जालना जिल्ह्यातील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपण संवाद साधला होता. त्यांच्या मागण्यांबाबत आपल्याकडे बैठकाही झाल्या होत्या. त्यांच्या मागण्यांवर सरकारकडून कार्यवाही सुरू होती; परंतु त्यानंतरही आंदोलन सुरू झाले.

हेही वाचा >>> Jalna Lathi Charge: सरकारच्या आदेशानेच जालन्यात लाठीमार नाना पटोले यांचा आरोप

जरांगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली. त्यांच्या जिवाची काळजी होती म्हणूनच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तिथे गेले. जरांगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे, अशी विनंती केली जात होती. त्यांनी प्रतिसादही दिला होता. ही दुर्दैवी घटना घडली, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून या घटनेतील सर्व  जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील, असे सांगितले. नोव्हेंबर २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने मराठा आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सरकारने घेतलेला मराठा आरक्षणाचा निर्णय उच्च न्यायालयाने ग्राह्यही ठरवला; पण सर्वोच्च न्यायालयाचा वेगळा निर्णय आला. हे कोणाच्या नाकर्तेपणामुळे झाले आहे हे सगळय़ांना माहिती आहे, असा टोलाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

हेही वाचा >>> फेरविचार, क्युरेटिव्ह याचिकांच्या कारणास्तव मराठा आरक्षणासाठी दोन वर्षे वाया

 मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. न्यायालयात राज्य शासन पूर्ण तयारीने हा खटला लढत आहे. त्यासाठी नामवंत वकील आणि घटनातज्ज्ञांची फौज उभी केली आहे. हा मुद्दा घटनात्मक असल्यामुळे काही अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गठित केलेली आहे. आरक्षण मिळवण्यासाठी ज्येष्ठ व तज्ज्ञ वकिलांचा कृतिगट (टास्क फोर्स) स्थापन करून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कायदेशीर उपाययोजना करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यास सरकारची तयारी

 सन २०१४ साली राज्य सरकारने अमलात आणलेल्या कायद्यानुसार समाजातील हजारो विद्यार्थाना महाविद्यालयात प्राधान्याने प्रवेश मिळाले. हजारो युवक/युवतींना शासकीय सेवांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. हे प्रवेश आणि नियुक्त्या सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवल्या, हे सर्वानी लक्षात घेतले पाहिजे; पण दुर्दैवाने हा कायदा रद्द करण्यात आल्यानंतरदेखील ३५०० उमेदवारांना आमच्या सरकारने प्राधान्याने अधिसंख्य पदे निर्माण करून नोकऱ्या दिल्या आहेत. समाजासाठी विविध सोयीसुविधा तसेच, सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो घटकांना लाभ दिले. सारथीच्या माध्यमातून आत्तापर्यंत २ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ८७ कोटी रुपये अर्थसाहाय्य दिले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आजवर ५१६ कोटी रुपये अर्थसाहाय्य दिले. विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच, परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. उच्च शिक्षणासाठी पाठय़वृत्ती आणि रोजगारासाठी पाठबळ दिले जात असल्याचेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. मराठा समाज अत्यंत शांततेने आपल्या हक्कांसाठी लढत आहे. या समाजाने जवळपास ५८ इतके मोर्चे राज्यभरात काढले. ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीचे होते. अत्यंत प्रामाणिकपणे आणि नेटाने हे मोर्चे काढले. त्याला कुठेही गालबोट लागले नाही; परंतु काही स्वार्थी राजकीय नेते मराठा तरुणांच्या आडून आपला स्वार्थ साधत असल्याचा आरोप त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा नेत्यांना टोला

काही मंडळी आहेत, जे स्वत:ला मराठा समाजाचे नेते समजतात, त्यांनी आजवर केवळ मराठा समाजातील विशिष्ट वर्गाच्या हिताला प्राधान्य दिले. राज्यभर गरीब मराठा समाज मोठय़ा प्रमाणात आहे, त्यांच्याकडे मात्र त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं; परंतु आता अचानक मराठा समाजाचा कळवळा घेऊन त्यांनी राजकारण सुरू केले; परंतु अशा पद्धतीने मराठा तरुणांच्या भावनांशी खेळून कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.