मंगल हनवते

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आजघडीला ७५ हजार कोटी रुपयांच्या मेट्रो मार्गिकांची कामे हाती घेतले असून, निधीउभारणीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ आता केंद्र सरकार आणि मुंबई महापालिकेकडे प्रत्येकी १० टक्के निधी (७५००कोटी) उपलब्ध करून देण्याची मागणी करणार आहे. याबाबत केंद्र आणि पालिकेला लवकरच पत्र पाठविण्यात येणार आहे.

‘एमएमआरडीए’ मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणत आहे. सध्या ७५ हजार कोटींच्या विविध मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी लागणारा निधी कसा आणि कुठून उपलब्ध करता येईल, याचा विचार सुरू असून त्याच वेळी केंद्र सरकारकडून मेट्रो मार्गिकेच्या एकूण खर्चापैकी १० टक्के निधी ‘एमएमआरडीए’ला उपलब्धच झाला नसल्याची बाब लक्षात आल्याची माहिती ‘एमएमआरडीए’तील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. देशभरातील मेट्रो प्रकल्पांसाठी केंद्राकडून १० टक्के निधी उपलब्ध करण्यात येतो. त्यानुसार २०१७ मध्ये १० टक्के निधी मिळविण्याची कार्यवाही राज्य सरकारने सुरू केली होती. मात्र, त्यानंतर यासंबंधीची पुढील कार्यवाही झालीच नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर ‘एमएमआरडीए’ने नस्ती शोधल्या असता २०१७ मध्ये १० टक्के निधी उपलब्ध करण्याबाबत राज्य सरकारने पाठपुरावा केल्याचे स्पष्ट झाल्याचे या अधिकऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>>ग्रामपंचायतींच्या २५ हजार जागांसाठी आज निवडणूक; राजकीय नेत्यांना ताकदीचा अंदाज येण्यास मदत

 ‘एमएमआरडीए’ने केंद्र सरकारकडे २०१८ मध्ये मेट्रो २ आणि मेट्रो ७ साठी १० टक्के निधीची मागणी केली होती. त्यानुसार केंद्राने ८११ कोटी रुपये निधी मंजूर केल्याचीही नस्ती सापडली असून हा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी कार्यवाही करण्यात आली नसल्याचेही उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडे ७५ हजार कोटींच्या मेट्रो प्रकल्पासाठी १० टक्के अर्थात ७५०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी पत्र पाठविण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पालिकेलाही लवकरच पत्र

मेट्रो क्षेत्रातील महानगरपालिकेकडूनही १० टक्के निधी दिला जातो. मात्र, मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेकडून असा निधीच उपलब्ध झालेला नाही. नागपूर, पुणे महापालिकेकडून १० टक्के निधी मेट्रोसाठी उपलब्ध होत असताना मुंबई पालिकेकडून निधी न मिळाल्याने केंद्राप्रमाणे पालिकेकडेही १० टक्के निधीसाठी लवकरच लेखी मागणी करण्यात येणार असल्याचेही ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

नववी गाडी दाखल

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी आवश्यक अशा नऊ मेट्रो गाडय़ांमधील अखेरची नववी मेट्रो गाडी शुक्रवारी मुंबईत दाखल झाली. आता लवकरच पहिल्या टप्प्यादरम्यान चाचण्यांना (ट्रायल रन) सुरुवात होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. हा टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. त्यासाठीच आता काही दिवसांतच या मार्गिकेवरील विविध चाचण्यांना सुरुवात करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्यात येणार आहे. दुसरीकडे पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक अशी शेवटची नववी मेट्रो गाडीही शुक्रवारी मुंबईत दाखल झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील एका कारखान्यात मेट्रो ३ च्या गाडय़ांची बांधणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी नऊ मेट्रो गाडय़ांची आवश्यकता होती. आता या सर्व नऊ गाडय़ा मुंबईतील आरे कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत.