मुंबई : संपूर्ण मुंबईत पाणी साचण्याची तब्बल ३८६ ठिकाणे आढळून आली असून गतवर्षी तेथील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे ४८२ उदंचन पंपांची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा ४१७ उदंचन पंपांची व्यवस्था करण्यात येणार असून ही व्यवस्था सक्षम करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.
मुंबईत पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईच्या कामांना वेग देण्यात आला आहे. यंदा अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे नालेसफाईच्या मुद्द्यावरून महापालिकेवर टीका झाली होती. पालिकेने यंदा पाणी साच्णाऱ्या ३८६ ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी ४१७ उदंचन पंप बसविण्यात येणार आहेत. दरम्यान, पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रविवारी पाहणी केली. उदंचन पंपांची यंत्रणा व पर्यायी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी अभियंत्यांनी कामामध्ये नाविन्यता आणण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या आहेत. गाळ उपसा व वहन प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी अभियंत्यांनी दक्ष रहावे.
कामात त्रुटी आढळल्यास कंत्राटदारांसमवेत अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. बांगर यांनी पश्चिम उपनगरातील वाकोला नदी, एस.एन.डी.टी नाला, ओशिवरा नदी, पिरामल नाला, रामचंद्र नाला आदी ठिकाणी पाहणी केली. उदंचन पंप बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनरेटर संच तातडीने उपलब्ध करावेत. तसेच फिरते उदंचन पंपदेखील तयार ठेवावेत. पर्यायी व्यवस्था म्हणून वाहन आधारित एक डिझेल जनरेटर संच देखील उपलब्ध करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा वाकोला नदी येथील सखल भागात ‘बॉक्स ड्रेन’ करण्यात येणार आहे.
एसएनडीटी नाला भागात लोखंडी जाळी लावण्याचा फायदा झाला असून या जाळ्यांमुळे घरगुती कचरा नाल्यामध्ये टाकण्याचे प्रमाण ९० टक्क्यांनी खाली आल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे. याच धर्तीवर दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नाल्यांभोवती दुतर्फा लोखंडी जाळ्या लावून नाल्याकडेला साचलेल्या घनकचरा, राडारोड्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना यंत्रणांना करण्यात आल्या आहेत. गतवर्षी या परिसरात पाणी साचण्याची २४ ठिकाणे होती. मात्र आता पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे विस्तारल्याने पाणी साचण्याची १३ ठिकाणे कमी करण्यात विभागाला यश आल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.