मुंबई: देशातील विविध आयआयटी संस्थांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी १८ मे रोजी जेईई ॲडव्हान्स परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या मागील १० वर्षांच्या तुलनेत जवळपास निम्मी होती. प्रश्नपत्रिकेतील तीन विभागांमधील प्रत्येक विभागात प्रत्येकी १८ असे ५४ प्रश्न विचारण्यात आले होते.
जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील आयआयटी संस्थांसह अन्य अभियांत्रिकी संस्थामध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा होतो. यंदा १८ मे रोजी घेण्यात आलेली जेईई ॲडव्हान्स परीक्षा ही तीन तासांच्या कालावधीमध्ये दोन सत्रामध्ये घेण्यात आली. ही परीक्षा गतवर्षीप्रमाणे १८० गुणांची घेण्यात आली.
पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरे सत्र दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत घेण्यात आले. पहिल्या सत्रात पेपर १ घेण्यात आला, तर दुसऱ्या सत्रात पेपर २ घेण्यात आला. दोन्ही पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित असे तीन विभाग होते. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एकूण ५४ प्रश्न होते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या प्रत्येक विभागात १८ प्रश्न विचारण्यात आले होते. गेल्या दोन वर्षात विचारलेल्या प्रश्नांच्या तुलनेत यंदा प्रश्नपत्रिकेत ५१ प्रश्न कमी विचारण्यात आले होते. मागील दोन वर्षांमध्ये जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये १०२ प्रश्न विचारण्यात आले होते.
मागील १० वर्षांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तुलनेत यंदाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची संख्या जवळपास निम्याने कमी होती. दहा वर्षांपूर्वी, २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये १२० प्रश्न विचारण्यात आले होते व २०२० मध्ये सुद्धा १२० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर प्रश्नांची संख्या सतत बदलत राहिली.
पुढे, २०१६ ते २०२० या ५ वर्षामध्ये घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स या परीक्षेत प्रत्येक वर्षी १०८ प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर २०२१ मध्ये परीक्षेतील प्रश्नांच्या संख्येत वाढ करण्यात येऊन ती ११४ एवढी होती. त्यानंतर, २०२३ आणि २०२४ या दोन वर्षांमध्ये १०२ प्रश्न विचारण्यात आले. यंदा मात्र ही संख्या ५४ इतकी कमी करण्यात आली. त्यामुळे, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेत ५१ प्रश्न कमी विचारण्यात आले. ही गेल्या १० वर्षातील सर्वात कमी संख्या आहे.