मुंबई : मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत गेल्या आठ दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. शनिवारी ८६७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही दुपटीने वाढली असून सध्या मुंबईत ४ हजार ६२४  रुग्ण उपचाराधीन आहेत.

जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत मुंबईतील करोना रुग्णांची दैनंदिन संख्या अडीचशे ते तीनशेच्या दरम्यान होती. ही संख्या गेल्या आठवडय़ापासून वाढत असून आता दर दिवशी आठशेच्या पुढे नवीन रुग्ण आढळत आहेत. शनिवारी दिवसभरात ८६७ नव्या रुग्णांची नोंद झाली. उपचाराधीन रुग्णसंख्याही वाढली असून सध्या ४ हजार ६२४ रुग्ण झाली. 

शनिवारी आढळलेल्या रुग्णांपैकी ९४ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर ५३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १७ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला. सध्या एकूण ३१९ रुग्ण रुग्णालयात दाखल असून प्राणवायू खाटांवर २४ रुग्ण आहेत. दिवसभरात ४८६ रुग्ण करोनामुक्त झाले.

 गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असताना अचानक मोठी रुग्णवाढ होत आहे. पावसाळी आजारांचे तसेच तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे करोना चाचण्याही वाढल्या आहेत.  करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९७ टक्के आहे. आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ११ लाख ३१ हजारांवर गेली आहे. तर रुग्णवाढीचा दर वाढत असून ०.०५ टक्के झाला. तर रुग्णदुपटीचा कालावधी कमी होऊन १ हजार ३७२ दिवसांवर आला.

ठाणे जिल्ह्यात २१९ नवे रुग्ण

ठाणे  : ठाणे जिल्ह्यात शनिवारी २१९ नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी ठाणे ८३, नवी मुंबई ६३, मीरा भाईंदर ३२, कल्याण-डोंबिवली २३, ठाणे ग्रामीण नऊ, उल्हासनगर सहा, भिवंडी दोन आणि बदलापूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.