मुंबईः पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातील चित्रीकरणाचे प्रकरण ताजे असताना आता आयआयटी, मुंबईमधील मुलींच्या वसतिगृहाच्या शौचालयात डोकावणाऱ्या उपहारगृहातील कर्मचाऱ्याला पवई पोलिसांनी अटक केली. उपहारगृहात काम करणारा आरोपी कर्मचारी रविवारी रात्री मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये डोकावत होता. त्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कर्मचाऱ्यावर चित्रीकरण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण  आरोपीच्या मोबाइलमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >>> अभिनेता अरमान कोहलीला अखेर जामीन; अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक

पिंटू गारिया (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. तो मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. उपहारगृह चालविणाऱ्या कंत्राटदारासाठी तो काम करीत होता. मुलींच्या वसतिगृहातील प्रसाधनगृहाच्या खिडकीतून कोणी तरी डोकावत असल्याचे एका विद्यार्थिनीने पाहिले. यानंतर तिने आरडाओरडा  केला. त्यामुळे तेथे अनेक जण जमले. कीटक नाशक औषधांची फवारणी करण्यासाठी येथील उपहारगृह रविवारी बंद ठेवण्यात आले होते. मात्र येथे काम करणारे कर्मचारी रात्री वसतिगृहाच्या आवारातच थांबले होते. वसतिगृह-१० मध्ये राहणाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपी पकडला गेला. त्यानंतर त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनी सांगितले की, वसतिगृहातील उपहारगृहातील कर्मचारी पाइप डक्टच्या मदतीने वर चढून शौचालयात डोकावत होता. प्राथमिक तपासात त्याने कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण केले नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा >>> मुंबईत लेप्टोचा धोका वाढतोय; आठवड्याभरात नऊ नवीन रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपड्यांच्या रंगावरून आरोपीची ओळख पटली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. तपासणीत आरोपीच्या मोबाइलमध्ये कोणतेही चित्रीकरण सापडले नाही. पण त्याचा मोबाइल जप्त करण्यात असून पुढील तपासणीसाठी तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. आरोपीला बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. आरोपीविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.