मुंबई: शीव येथील रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, शनिवारी या पुलाचे पाडकाम करण्यात येणार होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने या उड्डाणपुलाच्या निष्कासनाला तूर्तास स्थगिती दिली आहे.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने शीव रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल धोकादायक बनल्याचे अहवालात जाहीर केले होते. तसेच, पुलाची पुनर्बांधणी करण्याची शिफारसही करण्यात आली होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयातून या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता.
तसेच, शनिवारी पुलाचे पाडकाम करण्यात येणार होते. पुढील २४ महिन्यांत या पुलाची पुनर्बांधणी होणार असल्याची शक्यताही रेल्वे प्रशासनाकडून वर्तविण्यात आली होती. यासाठी बेस्ट उपक्रमानेही बसगाड्यांच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा पूल बंद केल्यास जनतेला प्रवासादरम्यान प्रचंड मनस्ताप सहन करावा लागेल. शिवाय, या विकासकामांसाठी स्थानिक जनतेला विश्वासात घेणे महत्त्वाचे असल्याचे मत खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले. यासंदर्भात शेवाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मध्य रेल्वे, मुंबई महानगरपालिका एफ उत्तर, जी उत्तर विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि पुल विभाग, तसेच वाहतूक पोलीस विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी आणि धारावीतील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या उड्डाणपुलाच्या निष्कासनाला प्रशासनाने तूर्तास स्थगिती द्यावी, अशी सूचना राहुल शेवाळे यांनी रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिली.
हेही वाचा >>>मुंबई विद्यापीठाच्या १४ परीक्षा पुढे ढकलल्या; २२ जानेवारीच्या परीक्षा ३१ जानेवारीला होणार
स्थानिक जनतेचा विकासाला विरोध नाही, मात्र कोणतीही कारवाई करताना जनतेला विश्वासात घ्या, अशी विनंतीही शेवाळे यांनी प्रशासनाला केली. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही शेवाळे यांनी सांगितले होते.दरम्यान, शीव उड्डाणपुलाच्या पाडकाम पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती शनिवारी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.