मुंबई : अंधेरी येथील सहार मार्गावरील टपाल आणि तार वसाहतीतील इमारत क्र. बी ३ चे छत आणि सज्जाचा भाग मंगळवारी कोसळला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच, त्यानिमित्ताने वसाहतीतील रहिवाशांना सतावणारे अन्य प्रश्नही समोर आले असून नागरिकांकडून त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इमारतींमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा, योग्य वीजपुरवठा होत नसून देखभालीसाठी पैसे घेऊनही कामे केली जात नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
सुमारे ४० ते ४५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या वसाहतीतील बहुतांश इमारतींची सद्यस्थितीत दुरावस्था झाली आहे. अनेक घरांची सातत्याने डागडुजी करावी लागते. मात्र, त्यानंतर काहीच महिन्यात पुन्हा डागडुजी करण्याची आवशयकता निर्माण होते. इमारत क्रमांक बी – ३ मध्ये मंगळवारी सकाळी अचानक खिडकीची काच फुटल्यामुळे रहिवाशांनी इमारतीबाहेर पळ काढला. त्यांनतर काही वेळातच इमारतीचे छत व सज्जाचा भाग कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, घरातील टीव्ही, लॅपटॉप, कपडे धुण्याचे यंत्र व अन्य घरगुती सामानाचे नुकसान झाले आहे.
दुर्घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत इमारतीची पाहणी केली आणि त्यानंतर दुरुस्तीकाम सुरू केले. या दुर्घटनेमुळे वसाहतीतील अन्य रहिवाशांनीही इमारतीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. दुर्घनाग्रस्त इमारतीची महिन्याभरापूर्वीच डागडुजी करण्यात आली होती. मात्र, त्यांनतर घडलेल्या घटनेमुळे कामाच्या दर्जावर प्रशचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याच्या टाकीचीही स्वच्छता करण्यात आली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. तसेच वसाहतीत सुरक्षित रस्ते व संरक्षक भिंत नसल्याने रात्री गर्दुल्यांचा वावर वाढल्याने रहिवाशांना सुरक्षेचा प्रश्न सतावत आहे.
कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रति महिना भाडे आणि देखभाल खर्च कापला जातो. मात्र, इमारतीच्या देखभालीची कामे दर्जेदार पद्धतीने होत नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. यापूर्वी इमारत दुरुस्तीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, रहिवाशांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने जीव मुठीत घेऊन इमारतीत वास्तव्य करावे लागत आहे.
वसाहतीतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. दुरावस्था झालेल्या इमारतींची संरचना तपासणी करून त्यांचे नव्याने बांधकाम हाती घ्यावे. तसेच, प्रलंबित बांधकाम आणि देखभालीची कामे पूर्ण करून अखंड पाणीपुरवठा सुरू करावा. रस्त्यावरील अकार्यक्षम पथदिवे बदलावे आदी मागण्या रहिवाशांनी केल्या आहेत.