मुंबई : जगभरातील प्रत्येक सहाव्या जीवाणू संसर्गावर अँटिबायोटिक्सचा परिणाम होत नसल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. ग्लोबल अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स अँड यूज सर्व्हिलन्स सिस्टीम (ग्लास) च्या डेटावर आधारित या अहवालात २०१८ ते २०२३ या कालावधीत जीवाणूंमधील प्रतिकारक्षमता तब्बल ४० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले आहे. भारतासारख्या देशात याचा धोका जास्त असल्याचे दिसून येते.

जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दहा देशांतील डेटाचे विश्लेषण करण्यात आले. त्यात आढळले आहे की, गेल्या पाच वर्षांत अँटिबायोटिक्सविरोधी जीवाणू ५ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर वार्षिक तपासणी अहवाला)नुसार भारतातील अतिदक्षता विभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वसाधारण अँटिबायोटिक्स सेफोटॅक्सिम, सेफ्टाझिडाइम, सिप्रोफ्लोक्सासिन आणि लेव्होफ्लोक्सासिन यांच्यावर जीवाणूंचा प्रतिकार वाढत आहे. आयसीएमआरच्या वरिष्ठ वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये अँटिबायोटिक्सचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे या औषधांविरोधातील प्रतिकारक्षमता जास्त आहे. मात्र आमचा डेटा प्रामुख्याने तृतीय श्रेणी रुग्णालयांतून येतो, त्यामुळे तो संपूर्ण लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करता येत नाही असेही त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, मूत्रमार्ग, पचनसंस्था, रक्तप्रवाह आणि लैंगिकरित्या पसरणाऱ्या संसर्गांसाठी वापरल्या जाणाऱ्या 22 औषधांवर प्रतिकारक्षमता तपासण्यात आली. यात पहिल्या टप्प्यातील औषधे निष्फळ ठरत असल्याने डॉक्टरांना शेवटच्या पर्यायांची महागडी औषधे वापरावी लागत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.दक्षिण-पूर्व आशिया आणि पूर्व भूमध्य समुद्र क्षेत्रात अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स (एएमआर) चे प्रमाण ३३ ते ६० टक्क्यांपर्यंत आहे तर उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे प्रमाण तुलनेने कमी आहे. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी, औषधांचा गैरवापर आणि रुग्णालयातील संक्रमण ही स्थिती अधिक गंभीर करत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

भारतामधील वाढता धोका

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार इकोलायसारखे काही जीवाणू हे सर्वाधिक प्रतिकारक्षम जीवाणू ठरले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मचे इ कोलाय व के न्युमोनियापैकी अनुक्रमे ५५ टक्क्यांहून अधिक जीवाणूंनी तिसऱ्या जनरेशनच्या काही औषधांना प्रतिसाद देणे थांबवले आहे. आफ्रिकन देशांमध्ये हा दर तब्बल ७० टक्क्यांवर गेला आहे.भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लास सर्वेक्षणात सातत्याने सहभाग घेतला आहे. जिल्हास्तरीय रुग्णालयांतही आता एएमआर (म्हणजे बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी आणि परजीवींनी औषधांना प्रतिसाद देणे थांबवणे याचा अभ्यास) डेटाचे संकलन सुरू झाले आहे. त्यामुळे प्रतिकारक्षमता ओळखण्यात सुधारणा झाली आहे.

भविष्यासाठी गंभीर इशारा

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, औषध-प्रतिरोधक ‘सुपरबग्स’मुळे पुढील २५ वर्षांत जगभरात चार कोटींपर्यंत मृत्यू होऊ शकतात. सध्या दरवर्षी सुमारे १० लाख लोकांचे जीव एएमआर संबंधित संसर्गांमुळे जात आहेत.एएमआर म्हणजे बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी आणि परजीवींनी औषधांना प्रतिसाद देणे थांबवणे. परिणामी सामान्य उपचार निष्फळ ठरतात. औषधांचा अतिरेकी आणि चुकीचा वापर हे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एएमआरला जगातील १० प्रमुख सार्वजनिक आरोग्य धोक्यांपैकी एक म्हणून घोषित केले आहे. जर औषधांचा योग्य वापर झाला नाही, तर पुढील दशकांत ‘सुपरबग्स’ आरोग्य क्षेत्रासाठी भयावह संकट ठरेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेन आपल्या अहवालात दिला आहे.