मुंबई : राज्यातील अवजड वाहने, मालवाहतूकदार संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी ११ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी संपाचा इशारा दिला होता. मालवाहतूकदार संघटनांनी सहाय्यकाची (क्लिनर) सक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत परिवहन विभागाने सकारात्मक भूमिका घेत मालवाहतूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत सहाय्यकाची (क्लिनर) आवश्यकता नसेल, याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्यातील जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी चालकांसोबत सहाय्यक देण्याची अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी केली होती. सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाहन निर्मिती होत असल्यामुळे सहाय्यकाची गरज भासत नाही. त्यामुळे विनाकारण खर्च वाढतो. खर्च कमी करण्यासाठी चालकासह सहाय्यक देण्याची अट शिथिल करण्यात येत आहे. याबाबत २९ ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

अंतिम निर्णय २९ ऑगस्टनंतर महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ९६ (२) (xxxii) अन्वये शासनाला दिलेल्या अधिकारांनुसार या नियमांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून, २९ ऑगस्ट २०२५ नंतर शासनाकडून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

हरकती किंवा सूचना परिवहन विभागाला कळविता येणार या मसुद्यावर कोणत्याही व्यक्तीने हरकती किंवा सूचना असल्यास त्या परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, पाचवा वा मजला, फाउंटन टेलिकॉम बिल्डिंग क्रमांक २, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे पाठवाव्यात. नियोजित तारखेपूर्वी प्राप्त झालेल्या हरकती व सूचना शासनाच्या विचारार्थ घेतल्या जातील, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

– महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम २४९ मध्ये वरील तरतूद समाविष्ट करण्यात येणार आहे.

– जड मालवाहतूक वाहनामध्ये सहाय्यक असणे बंधनकारक नाही, मात्र ड्रायव्हर असिस्ट सिस्टीमने (डीएएस) सुसज्ज असलेल्या वाहनांसाठीच ही सवलत लागू राहील.

– ड्रायव्हर असिस्ट सिस्टीममध्ये ३६० अंश दृश्य कॅमेरा, सर्व ब्लाइंड स्पॉट व मागील भागाचे थेट दृश्य उपलब्ध करून देणारी सुविधा, तसेच ध्वनी आणि दृश्य स्वरूपात इशारे देणारी प्रॉक्सिमिटी अलार्म प्रणाली असणे आवश्यक आहे.

– ही प्रणाली वाहन रिव्हर्समध्ये असताना मागून येणाऱ्या वाहनचालकांना व इतर रस्त्यावरील वापरकर्त्यांना पुरेशी पूर्वसूचना देईल व चालकाला सुरक्षिततेसाठी आवश्यक इशारे देईल.