मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून सध्या रूळ टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत रुळांचे ५८ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) युद्धपातळीवर ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम करीत आहे. ३३.५ किमी लांबीच्या भुयारी ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरसीचा मानस आहे. त्यामुळे एमएमआरसीने कामाला वेग दिला आहे.

एकूण प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण टप्प्याचे भुयारीकरण पूर्ण झाल्यानंतर एमएमआरसीने रूळ टाकण्याच्या कामाला सुरुवात केली होती. या कामानेही वेग घेतला असून आतापर्यंत रूळाचे ५८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. आरे मेट्रो स्थानक ते वरळी, चर्चगेट ते कफ परेडदरम्यान रुळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर वरळी ते चर्चगेटदरम्यान रुळ टाकण्याचे काम शिल्लक आहे. येथील रूळ टाकण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> उच्च न्यायालय खंडपीठाच्या कार्यसूची बदलाची चर्चा; न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठाकडील प्रकरणे अन्य खंडपीठाकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुळाचे काम वेगात सुरू असतानाच दुसरीकडे आरे कारशेडच्या कामानेही वेग घेतला असून आतापर्यंत कारशेडचे ५४ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी दरम्यानचे ८५.२ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी ते कफ परेड दरम्यानचे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र त्याचवेळी डिसेंबरमध्ये कार्यान्वित होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील आरे मेट्रो स्थानकाचे केवळ १५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर म्हणजेच काही महिन्यांपूर्वीच या स्थानकाचे काम सुरू झाले आहे. मात्र हे कामही वेगात पूर्ण करून डिसेंबरमध्ये पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल, असा विश्वास एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.