मुंबई : गेले अनेक महिने पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडुप उदंचन केंद्राजवळ एक सार्वजनिक शौचालय बांधून तयार आहे. परंतु या शौचालयात वीज आणि पाण्याची सोय नसल्यामुळे हे शौचालय अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. या रस्त्यावर नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे हे शौचालय लवकर सुरू करावे, अशी मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

मुंबईत दररोज कामानिमित्त येणाऱ्या नोकरदारांची संख्या प्रचंड असून मुंबईत प्रसाधगृहांची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र मुंबईत शौचालयांची कमतरता आहे. तसेच शौचालय बांधण्यासाठी जागा नाही. पण पूर्व द्रुतगती मार्गावर भांडूप येथे (मुलुंडच्या दिशेने) एक चांगले शौचालय बांधून पूर्ण झाले आहे. गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता आणि पूर्व द्रुतगती मार्ग यांच्या संगमस्थानावर हे शौचालय आहे.

मात्र अनेक महिने होऊनही हे शौचालय सुरू झालेले नाही. त्यामुळे हे शौचालय लवकर सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे) ॲड. सागर देवरे यांनी केली आहे. ॲड. देवरे यांनी पालिका प्रशासनाला पत्र पाठवून हे शौचालय लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. या मार्गावरून हजारो नागरिक प्रवास करीत असतात. तसेच अनेक नागरिक या ठिकाणी आपल्या वाहनांची, बस, रिक्षांची वाट बघत असतात. त्यामुळे या ठिकाणी शौचालयाची फार गरज असून हे शौचालय लवकर सुरू करणे नागरिकांसाठी अतिशय गरजेचे आहे, असे ॲड. देवरे यांनी म्हटले आहे. जलजोडणी (कनेक्शन) नसल्यामुळे हे शौचालय गेले वर्षभर तयार असूनही सुरू करण्यात आलेले नाही.

दोन तीन दिवसात जल जोडणी…

याबाबत पालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शौचालय ज्या जागेवर बांधण्यात आले आहे ती जागा मिठागर आयुक्तांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे जलजोडणी व वीजजोडणी देण्यास वेळ लागत आहे. मात्र आठवड्याभरापूर्वीच एमएसईबी आणि मिठागर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली असून येत्या दोन – तीन दिवसांत जल जोडणी व वीज जोडणी दिली जाईल. शौचालयाच्या देखभालीसाठी आधीच संस्थेची निवड करण्यात आली असून जलजोडणी व वीजजोडणी दिल्यानंतर लगेचच संस्थेला कार्यादेश दिला जाईल आणि शौचालय सुरू करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रजा फाऊंडेशनने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, मुंबईत दर चार सार्वजनिक शौचालयांपैकी केवळ एक शौचालय स्त्रियांसाठी आहे. तर एका सामुदायिक शौचायलयाचा वापर ८६ पुरुष आणि स्त्रियांच्या एका शौचालयाचा वापर ८१ स्त्रिया करतात. स्वच्छ भारत अभियानाच्या मापदंडानुसार एका शौचालयाच्या वापर ३५ पुरुष आणि २५ स्त्रिया या प्रमाणात होणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा शौचालयांचा वापर बराच जास्त असल्याचेही आकडेवारीतून पुढे आले आहे. त्यामुळे पुरेशी सार्वजनिक व सामुदायिक शौचालये बांधण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. तर गेल्या दहा वर्षांत शौचालयाशी संबंधित तक्रारींमध्ये २१८ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही या अहवालात म्हटले होते.