मुंबई : शासकीय विधि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

विधि अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या आणि पाचव्या वर्षांच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकांना अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २६ एप्रिल रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २७ एप्रिलला जाहीर करण्यात आला. मात्र मूळ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे ३२ विद्यार्थ्यांचे वर्ष धोक्यात आले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. महाविद्यालयांकडे परीक्षेचे कामकाज सोपवल्यापासून महाविद्यालये मनमानी कारभार करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

‘मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होतात, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळते. मात्र फक्त शासकीय महाविद्यालयाने ही संधी दिली नाही. याबाबत महाविद्यालयाला निवेदन देण्यात आले होते. मात्र महाविद्यालयाच्या प्रशासनाने परीक्षा घेण्यास नकार दिला,’ असे मुंबई स्टुडंट लॉ काउन्सिलचे सचिन पवार यांनी सांगितले.