गेला पंधरवडा दडी मारून राहिलेला मान्सून पुन्हा सक्रीय होत असून तीन ते चार दिवसांत तो उत्तर भारतात काश्मिपर्यंत पोहोचण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. मंगळवारी मुंबई-ठाणे परिसरात पावसाच्या सरी येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे पाणीकपातीचे संकट लगेचच दूर होणार नसले, तरीही संभाव्य मान्सून पुन्हा सक्रीय होत असल्याचा दिलासा मिळू शकेल.
अरबी समुद्राच्या दक्षिण भागात मान्सून सक्रीय झाला असून केरळ किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. राज्यात मात्र कोकणातील काही भागातील पावसाचा शिडकावा वगळता इतर भाग मात्र कोरडाच राहिला आहे. मात्र ही दृष्काळसदृश्य स्थिती पालटण्याची चिन्हे दिसत आहेत. केरळात सक्रीय असलेला पाऊस दोन दिवसात राज्याच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकेल. मंगळवारी मुंबईसह दक्षिण व उत्तर कोकणात पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने व्यक्त केला आहे. हा पाऊस काही दिवस तरी मुंबई परिसरात मुक्काम करेल, अशी आशा आहे. मात्र स्थानिक परिस्थिती व त्यावेळचे हवामान याबाबतचा अंदाज पाहूनच याबाबत ठामपणे सांगता येईल, असे हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.  २० जूनला मान्सूनने राज्याच्या अंतर्गत भागात प्रवेश केल्याचे वेधशाळेने जाहीर केले होते. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आणि मान्सून गेले दहा दिवस पुढे सरकू शकला नाही.
पाणीकपातीचा निर्णय आज
मान्सून पुन्हा सक्रीय होत असल्याची सुचिन्हे असली तरी मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळू शकणार नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी केवळ मोडकसागर व भातसा यांमध्येच पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा महिनाभर पुरण्याची शक्यता आहे. मात्र तरीही पालिका दहा ते वीस टक्के पाणीकपात करण्याची शक्यता असून सोमवारी याबाबत निर्णय होईल.