मुंबई : कॅनरा एचएसबीसी लाइफची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) १० ऑक्टोबरपासून सुरू होत असून गुंतवणूकदारांना १४ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येईल. यासाठी कंपनीने १०० रुपये ते १०६ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. सुकाणू गुंतवणूकदारांना ९ ऑक्टोबर रोजी बोली लावता येणार आहे. त्याच आठवड्यात कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंटची देखील प्रारंभिक समभाग होणार आहे, ही कॅनरा रोबेको यांच्या संयुक्त उपक्रमांतील संपत्ती व्यवस्थापन कंपनी आहे. तिचा आयपीओ ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान खुला होत आहे. यामुळे कॅनरा बँकेशी संबंधित दोन कंपन्यांची या आठवड्यात समभाग विक्री होणार आहे.
कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स कंपनी ही सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक आणि एचएसबीसी समूहाचा संयुक्त उपक्रम आहे. ज्यामध्ये कॅनरा बँकेची ५१ टक्के हिस्सदारी आहे आणि एचएसबीसी समूहाच्या एचएसबीसी इन्शुरन्स (एशिया पॅसिफिक) होल्डिंग्जकडे २६ टक्के हिस्सा आहे. या भागविक्रीच्या माध्यमातून कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक त्यांचा भांडवली हिश्शाच्या आंशिक विक्रीच्या (ऑफर फॉर सेल) माध्यमातून २३.७५ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत. यातून कंपनीचा २,५१६ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे. कॅनरा बँक १३.७७ कोटी शेअर, एचएसबीसी इन्शुरन्स (एशिया-पॅसिफिक) होल्डिंग्ज लिमिटेड ४७.५ लाख शेअर विक्री करेल. तर पंजाब नॅशनल बँक ९.५ कोटी समभाग विकण्याची योजना आखत आहे. आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून संपूर्ण समभाग विक्री करण्यात येणार असल्याने यातून कंपनीला कोणताही निधी मिळणार नसून संपूर्ण निधी हा प्रवर्तक कंपन्यांकडे जाणार आहे.
२००७ मध्ये स्थापन झालेली कॅनरा एचएसबीसी लाईफ भारतीय आयुर्विमा विमा क्षेत्रातील एक आघाडीची विमा कंपनी आहे. आयपीओमध्ये ५० टक्के भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्यूआयबी), ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५ टक्के भाग गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. गुंतणूकदारांना किमान १४० समभाग आणि त्यापटीत समभागांसाठी बोली लावता येईल. कॅनरा एचएसबीसी लाईफचा समभाग येत्या १७ ऑक्टोबरला भांडवली बाजारात सूचिबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंटची देखील प्रारंभिक समभाग विक्री येत्या ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान होत आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, कॅनरा बँकेला आयुर्विमा आणि म्युच्युअल फंड उपक्रमांमधील बँकेचा हिस्सा विकण्याच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेची मान्यता मिळाली आहे.