मुंबई : मनोरुग्णालयातील उपचारानंतर बर्या झालेल्या वा होऊ घातलेल्या मनोरुग्णांना स्वत:च्या पायवर उभे करणे हे खरोखरच एक मोठे आव्हान आहे. ठाणे मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ नेताजी मुळीक यांनी ते यशस्वीपणे पेलले असून मनोरुग्णालयातील तब्बल ३० महिलांना स्वत:च्या पायवर उभे केले आहे. या महिलांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीतून ब्युटीशीयन,मेकअप व हेअरस्टाईल चे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

“स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय या जगात निभाव लागणं कठीण आहे,” असं म्हटलं जातं. मात्र, मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला सक्षम करण्यासाठी काय करावं, हा मोठा प्रश्न असतो. यावर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने समर्पक उत्तर शोधत मनोरुग्ण महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. ‘रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकार’ आणि ‘नॅक फाउंडेशन’ यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमातून आतापर्यंत ३० महिला रुग्णांनी प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत मजल मारली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये हा उपक्रम सुरु करण्यात आला असून चार टप्प्यात हे प्रशिक्षण देण्यात येते. दोन महिन्यांचा हा प्रशिक्षण कालावधी असून बहुतेक महिलांनी तो पूर्ण केले आहे.

मनोरुग्णांवरील उपचारांबरोबरच त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा विकास करणे हे ठाणे मनोरुग्णालयाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग हा उपक्रम राबवत आहे.ऑगस्ट २०२४ पासून सुरू असलेला चार-स्तरीय ब्युटीशियन कोर्स असून प्रत्येक स्तरात १० महिला रुग्णांना प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत तिसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणात बेसिक ब्युटी सर्व्हिसेस, फेशियल, मेकअप आणि हेअर स्टाइल यांसारख्या कौशल्यांचा समावेश आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात येते. अर्थात यात एक मोठे आव्हान असल्याचे डॉ मुळीक सांगतात. ज्या महिला रुग्ण बर्या होऊन घरी गेल्या आहेत त्यांना नियमितपणे येथे आणण्यात घरच्यांचा विरोध असतो. परिणामी घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणे मोठे आव्हान असते. अशा सुमारे पंधरा महिला असून उर्वरित महिला या रुग्णालयातील आहेत. सध्या ठाणे मनोरुग्णालयात अडचशे महिला असून यातील आणखीही काही महिला आगामी काळात बर्या होतील.

मनोरुग्ण महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षणासोबतच हस्तकला, सण-उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू तयार करणे आणि इतर व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षणही दिले जाते. यामुळे, उपचार घेत असतानाच त्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ. हेमांगिनी देशपांडे, डॉ. जानवी केरझरकर, डॉ. आश्लेषा कोळी, डॉ. प्राजक्ता मोरे आदी तज्ञ अथक परिश्रम घेत असल्याचेही डॉ मुळीक यांनी सांगितले. रोटरी क्लबच्या प्रमुख हेमा देशपांडे व नँकच्या सौम्या भस्करन यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे. यापूर्वी मनोरुग्णालयातील पुरुष व महिला रुग्णांसाठी कृत्रिम दागिने घडविण्याचा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यात यशस्वी झालेल्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मनोरुग्ण महिलांनी उपचारानंतर समाजात आत्मनिर्भरपणे वागावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत,” असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले. या प्रशिक्षणामुळे मनोरुग्ण महिलांना आत्मविश्वास मिळत असून, त्यांचे भविष्यातील जीवन अधिक सुरक्षित आणि स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.