मुंबई : आजाराचे वेळेत योग्य निदान न झाल्यामुळे मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात १२ ते १६ वयोगटातील तीन मुलांचा क्षयरोगाने मृत्यू झाला. मात्र या मुलांचे योग्य निदान करण्याबाबत सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांकडून नव्हे, तर खासगी डॉक्टरांकडून चूक झाल्याने त्यांना प्राण गमवावे लागले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उलट्या होत असल्याने १५ वर्षीय मुलीला तिचे पालक स्थानिक डॉक्टरकडे उपचारासाठी घेऊन गेले होते. उलट्या होणे हे क्षयरोगाचे एक लक्षण असतानाही डॉक्टराने त्याचे निदान केले नाही. मात्र तिला औषध प्रतिरोधक क्षयरोग झाल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला रुग्णालयामध्ये नेण्यास सांगितले. या १५ वर्षांच्या मुलीला रुग्णालयामध्ये नेण्यात आले, त्यावेळी ती चक्कर येऊ कोसळली.

तिला जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. सामान्य डॉक्टरांकडे उपचार करून शेवटच्या टप्प्यामध्ये रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मृत्यू झालेल्या तिन्ही रुग्णांच्या बाबतीत असेच घडले आहे. मुलांमध्ये डीआर-टीबी हा एक गंभीर आजार आहे. मुलांचे ओटीपोट, फुफ्फुस, हाडे, मेंदू, आतडी, त्वचा आदींमध्ये क्षयरोगाचे निदान होताना दिसत आहे. बहुतांश अशा रुग्णांना खूप उशीरा आणि कधी कधी बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात येते. यापैकी अनेक रुग्णांना नियंत्रित करणे अशक्य असते, असे रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुखांनी सांगितले.

१२-१६ वयोगटातील मुलांमधील क्षयरोगाच्या निदानास विलब होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक वेळा पालक वेळीच बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेत नाहीत. त्याऐवजी मुलांना स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन जातात. सामान्य डॉक्टरांना लहान मुलांमधील क्षयरोगाचे निदान करण्यात काही अडचणी येतात. लहान मुले आणि मोठ्यांमधील क्षयरोगाच्या लक्षणांमध्ये फरक असल्याने सामान्य डॉक्टरांना लगेच निदान करणे शक्य होत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत एकूण क्षयरोगाच्या रुग्णांपैकी सुमारे ७ ते ९ टक्के मुले क्षयरोगाचे रुग्ण आहेत. शहरात दरवर्षी सुमारे ६० हजार क्षयरोगाचे रुग्ण आढळतात. सुरुवातीला क्षयरोगावर उपचार मिळण्यास बराच विलंब होतो. क्षयरोगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा त्यास कारणीभूत आहे. क्षयरोग असलेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा विलंब होणे नियमित झाले आहे. मुलांना सर्दी, खोकला झाल्यावर पालक त्यांना बालरोग तज्ज्ञांकडे नेण्याऐवजी स्थानिक डॉक्टरांकडे नेतात. त्यामुळे क्षयरोगाचे निदान होण्याच विलंब होऊन रुग्णांना औषध प्रतिरोधक क्षयरोग होत असल्याचे क्षयरोग कार्यकर्ते गणेश आचार्य यांनी सांगितले.