मुंबई: वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर यांच्यावर असलेला अभ्यास व कामाचा ताण यामुळे अनेक वेळा डॉक्टर नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्येचे पाऊल उचलतात. त्यामुळे निवासी डॉक्टरांसह पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक आराेग्य उत्तम राखण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ‘मार्ड’सोबत ‘थ्री एम’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवासी डॉक्टरांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ‘मार्ड’ने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांची भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, आरोग्य विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, कुलसचिव डॉ. राजेंद्र बांगल, एमएसएमटीएचे अध्यक्ष डॉ. गोलावर, केंद्रीय मार्डचे अध्यक्ष, राज्य संयोजक, उपाध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा… सट्टा खेळण्यासाठी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याला अटक; ओशिवरा पोलिसांची कारवाई

‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांनी निवासी डॉक्टरांना भेडसावणाऱ्या विविध समस्या कुलगुरूंसमोर मांडल्या. शैक्षणिक समस्येबरोबरच विद्यार्थी व शिक्षण यांच्यातील नातेसंबंधावरही चर्चा झाली. ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर बैठकीत अधिक भर दिला. यावेळी डॉ. माधुरी कानिटकर यांनी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ व ‘मार्ड’ने संयुक्तपणे सर्वंकष असा ‘थ्री एम’ कार्यक्रम तयार करण्याचे ठरवले. या कार्यक्रमांतर्गत विद्यापीठ आणि मार्ड डॉक्टरांचे मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी एक योजना तयार करतील. या माध्यमातून निवासी डॉक्टरांमधील कलागुण शोधून त्यांना चालना देऊन डॉक्टरांना प्रोत्साहित करण्यात येईल.

डॉक्टरांवर असलेला प्रचंड मानसिक तणाव कमी करण्यासाठी मार्ड पुढाकार घेऊन ‘थ्री एम’ अंतर्गत सायंटिफिक क्लब, कला क्लब व छंद क्लब उभारतील. तसेच डॉक्टरांमधील तणाव कमी करण्यासाठी डॉक्टरांची ‘कोड ब्ल्यू टीम’ तयार करण्यात येईल, या तुकडीमध्ये मदत करण्याचे कौशल्य असलेल्या डॉक्टरांचा समावेश करण्यात येणार आहे. ‘कोड ब्ल्यू टीम’सोबत मार्ड मानसिक तणावाखाली असलेल्या डॉक्टरांना तणावातून बाहेर काढण्यास मदत करेल, असे यावेळी बैठकीमध्ये ठरल्याचे ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. अभिजित हेलगे यांनी सांगितले.

राज्यस्तरीय परिषद घेण्याबाबत विचार

राज्यातील पदवी, पदव्युत्तर, निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव यावेळी मार्डने मांडला. या प्रस्तावाला डॉ. माधुरी कानिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याचे मार्डकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three m initiative with mard to maintain the mental health of undergraduate students along with resident doctors in maharashtra mumbai print news dvr
First published on: 09-01-2024 at 13:11 IST