Nails Found On Nagpur Mumbai Expressway Bridge : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर ठोकण्यात आलेल्या खिळ्यांमुळे बुधवारी रात्री तीन गाड्यांचे टायर पंक्चर झाल्याचे उघडकीस आले. यासंबंधीची ध्वनिचित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीए) जाग आली असून त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. एमएसआरडीसीच्या स्पष्टीकरणानुसार छत्रपती संभाजी नगर येथे समृद्धी महामार्गावरील पहिल्या आणि दुसऱ्या मार्गिकांवर १५ मीटर जागेवर सूक्ष्म तडे गेले होते.

त्यामुळे या भागाच्या दुरुस्तीसाठी एमएसआरडीसीच्या कर्मचाऱ्यांनी नोजल्स (लोखंडी खिळ्याप्रमाणे दिसणारे उपकरण) ठोकले होते. या कामादरम्यान वाहतूक वळविण्यात आली होती. मात्र काही वाहने काम सुरू असलेल्या आणि खिळे लावण्यात आलेल्या मार्गिकेवरून जाऊ लागली आणि त्यामुळे तीन वाहनांचे टायर पंक्चर झाल्याचे स्पष्टीकरण एमएसआरडीसीने दिले आहे. प्रवाशांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मोठी दुर्घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोण असते, असा प्रश्न प्रवाशांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

समृद्धी महामार्ग काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात, चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना, प्रवाशांना लुटण्यासाठी समाजकंटकांकडून महामार्गावर खिळे टाकून वाहने बंद पाडली जात असल्याची माहिती, ध्वनिचित्रफित व्हायरल करण्यात आली होती. त्यानंतर एमएसआरडीसीने अशी कोणतीही घटना महामार्गावर घडली नसल्याचे स्पष्ट केले.

तर महामार्गावरून जाणाऱ्या एका मालवाहू वाहनातून लोखंडी पत्रा पडला, अंधारात तो वाहनचालकांना दिसला नाही आणि त्यावरून वाहने गेल्याने ५० हून अधिक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याचेही एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले होते. आता समृद्धी महामार्गावर खिळे टाकण्यात आल्याची ध्वनिचित्रफित बुधवारी सकाळपासून मोठी प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही ध्वनिचित्रफित व्हायरल झाल्यानंतर अखेर आता एमएसआरडीसीने यासंबंधी खुलासा केला आहे.

एमएसआरडीसीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार छत्रपती संभाजी नगर येथे साखळी क्रमांक ४४२ ते ४६० दरम्यान १५ मीटरच्या क्षेत्रफळावरील पहिल्या आणि दुसऱ्या मार्गिकांवर सूक्ष्म तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर एमएसआरडीसीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. या दुरुस्तीअंतर्गत महामार्गावर १५ मीटर लांबीदरम्यान नोजल्स अर्थात खिळ्यासारखी दिसणारी लोखंडी उपकरणे ठोकण्यात आली होती. तर हे काम करण्यासाठी पहिली आणि दुसरी मार्गिका कामाच्या ठिकाणादरम्यान बंद करून वाहतूक वळविण्यात आली होती.

याच मार्गिकेवरून बुधवारी रात्री १२ नंतर काही वाहने गेली आणि नोजल्सवरून गेलेल्या तीन वाहनांचे टायर पंक्चर झाले. याची माहिती रात्री १२.१० वाजता मिळताच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी, गस्त वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांतर या मार्गिका पूर्णत: बंद करून नोजल्स काढण्याचे काम सुरू करण्यात आले. सकाळी ५ पर्यंत हे काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतर, सकाळी ५ वाजल्यापासून बंद मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. आता वाहतूक सुरळीत सुरू असून रात्री कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे. मात्र एमएसआरडीसीच्या या कारभारावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर नोजल्स काढण्याचा विसर

नोजल्स लावून दुरुस्ती केल्यानंतर ते काढणे अपेक्षित होते. मात्र रात्री ११.३० वाजता काम पूर्ण झाल्यानंतरही खिळे काढण्यात आले नाहीत. कामगार खिळे काढण्यास विसरल्याचेही सांगितले जात आहे. कामगारांच्या या चुकीमुळे टायर पंक्चर झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. तर अशा बेजबाबदारपणामुळे मोठी दुर्घटना घडण्याचीही भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या घटनेची दखल घेत एमएसआरडीसीने आता कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.