वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५ मेपासून कपात झाली आणि त्यानंतर या सेवेच्या तिकीट आणि पास विक्रीत वाढ होऊ लागली आहे. जूनमध्येही गारेगार प्रवासाला प्रवाशांनी पसंती दिली आहे. त्यामुळे मेच्या तुलनेत जूनमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एकूण तिकीट विक्री प्रत्येकी दोन लाखांपार गेली आहे. मध्य रेल्वेवर जूनमध्ये एकूण दोन लाख नऊ हजार ३९५ आणि पश्चिम रेल्वेवर दोन लाख ३८ हजार २७४ तिकीटांची विक्री झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार मार्गावर वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. सुरुवातीपासून या सेवांना अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे तिकीट दरात कपात करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. अखेर ५ मेपासून तिकीट दरात ५० टक्के कपात करण्यात आली. वाढलेला उकाडा आणि तिकीट दरातील कपात यामुळे मे महिन्यात या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. मध्य रेल्वेवर मेमध्ये एकूण एक लाख ८४ हजार ७९९ तिकीटांची विक्री झाली, तर पश्चिम रेल्वेवर एक लाख ९६ हजार ९३८ तिकीटे विकली गेली. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने आणि असह्य उकाडा वाढल्याने वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढला. मध्य रेल्वेवर जूनमध्ये एकूण दोन लाख ९ हजार ३९६, तर पश्चिम रेल्वेवर दोन लाख ३८ हजार २७४ तिकिटांची विक्री झाली आहे. एप्रिल २०२२ मध्ये पश्चिम रेल्वेवर ५६ हजार, तर मध्य रेल्वेवर ५६ हजार २२१ इतकी तिकीट विक्री झाली होती.

पास विक्रीतही वाढ –

रेल्वे – मे – जून
मध्य रेल्वे – १४,२२१ – १६,१६१

पश्चिम रेल्वे – १६,३८९ – १९,४७१