मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये गर्दी वाढत असून, प्रवाशांना धक्काबुक्की सहन करीत प्रवास करावा लागत आहे. वातानुकूलित लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. मात्र, या गर्दीमध्ये विनातिकीट किंवा अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने, मध्य रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी ‘वातानुकूलित टास्क फोर्स’ सुरू केले आहे. गेल्या १३ महिन्यांत प्रवाशांकडून यासंदर्भात ११,१३४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने या सर्व तक्रारींचे १०० टक्के निराकरण करून १.२२ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडून ४ कोटी रुपयांची दंड वसूल केला.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांची सुरक्षितता आणि सुकर प्रवासाची सुविधा लक्षात घेऊन विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी २५ मे २०२४ पासून ‘वातानुकूलित टास्क फोर्स’ कार्यान्वित करण्यात आला आहे. प्रवाशांना तक्रारीसाठी माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रवाशांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी वॉट्स ॲप क्रमांक ७२०८८१९९८७ सुरू करण्यात आला आहे. हा क्रमांक २४x७ सुरू केल्याने त्यावर प्रवाशांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. प्रवाशांनी व्हाॅट्स ॲपवर तक्रार केलेल्या प्रत्येक तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या १०० टक्के तक्रारींचे निराकरण
‘वातानुकूलित टास्क फोर्स’ २५ मे २०२४ रोजी कार्यरत झाल्यानंतर ३० जून २०२५ पर्यंत एकूण ११,१३४ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्वरित त्यांची दखल घेऊन निराकरण करण्यात आले. आतापर्यंत प्रवाशांच्या १०० टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. या सक्रिय अंमलबजावणीमुळे तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. जून २०२४ मध्ये सरासरी ७९ तक्रारी दररोज प्राप्त होत होत्या. ते प्रमाण जून २०२५ मध्ये २९ वर आले. दैनंदिन कमाल तक्रारींची संख्याही जून २०२४ मध्ये २२८ वरून जून २०२५ मध्ये १०३ वर आली आहे.
४.०१ कोटी रुपये दंड वसुली
वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवासी प्रवास करत असल्याची १.२२ लाख प्रकरणे आढळली. या प्रकरणांमध्ये ४.०१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दररोज सरासरी ३६५ प्रवासी विनातिकीट वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करीत असल्याचे समोर आले असून, त्याद्वारे दररोज सरासरी १.१९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
वातानुकूलित लोकलमधून ७८ हजार प्रवाशांचा प्रवास
मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वेवरून दररोज सुमारे ३९ लाख प्रवासी प्रवास करतात. यासाठी दररोज १,८१० लोकल सेवा चालवल्या जातात. त्यापैकी ८० वातानुकूलित लोकल धावतात. या वातानुकूलित लोकलमधून दररोज सुमारे ७८ हजार प्रवासी प्रवास करतात.