स्थानिक संस्था कर भरण्यास ठेंगा दाखविणाऱ्या व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी नागरिकांची मदत घेण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून अशा करचुकव्या व्यापाऱ्यांकडून यापुढे खरेदी करू नका, असे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत आपले उखळ पांढरे करू पाहणाऱ्या  करबुडव्या व्यापाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेने स्थानिक संस्था कर लागू केला असून तो भरण्यासंबंधी शहरातील सर्वच व्यापारी आणि दुकानदारांना आवाहन केले आहे. मात्र, तरीही व्यापाऱ्यांकडून त्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. याच पाश्र्वभूमीवर महापालिकेने स्थानिक संस्था कर भरण्यास असहकार दाखविणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांवर धाडी टाकण्यास सुरूवात केली. ऐन दिवाळी खरेदीची धामधुम सुरू असतानाच पालिकेने व्यापाऱ्यांविरोधात धाडसत्र सुरू केले. आतापर्यंत १२ दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या असून त्यामध्ये कर, दंड आणि व्याज असे एकूण तीन कोटीपेक्षा जास्त वसूली करण्यात आली आहे. मात्र, या धाडसत्रांमुळे शहरातील कर चुकव्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. असे असतानाच कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून यापुढे खरेदी करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत व्यापाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

एलबीटी क्रमांकाची मागणी करा..
नागरिकांनी केलेल्या खरेदीमधून दुकानदार स्थानिक संस्था कर वसूल करतात. मात्र, नागरिकांच्या खिशातून कापलेला हा कर काही दुकानदार महापालिकेकडे भरत नाहीत. त्यामुळे अशा दुकानदारांकडून खरेदी करू नये आणि ठाणे शहराच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन आयुक्त गुप्ता यांनी केले आहे. तसेच कोणतीही खरेदी करताना दुकानदारांकडून स्थानिक संस्था कर नोंदणी क्रमांकाची मागणी करावी, त्यांच्याकडे क्रमांक असेल तर खरेदी करावी अन्यथा खरेदी करू नये, असेही त्यांनी सांगितले आहे.