मुंबई : जातीयवाद हा अभिशाप असून, विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला जातिविरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी केले. स्वातंत्र्यानंतर भारताच्या शेजारील अनेक राष्ट्रांमध्ये लोकशाही रुजली नाही. परंतु, भारत सातत्याने लोकशाही मार्गावर चालत आला, याचे श्रेय डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला जाते, असेही राधाकृष्णन यांनी नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दादर परिसरातील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला सोमवारी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

त्यानंतर, आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या भूमीने देशाला छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने दोन महान सुपुत्र दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून देशाला वाचविले, तर भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी समतेसाठी आपले जीवन वेचले, अशा भावना राज्यपाल यांनी व्यक्त केल्या. धर्म परिवर्तनाचा विचार त्यांच्यापुढे आला, त्यावेळी त्यांनी भारताच्या मातीत निर्माण झालेल्या बौद्ध धर्माचा अंगीकार केला, यावरुन डॉ. आंबेडकर यांचे द्रष्टेपण दिसून येते, असे राधाकृष्णन यांनी नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्माते होते. नेहमी समाजाचा, देशाचा व विश्वकल्याणाचा विचार करणारे ते सच्चे राष्ट्रपुरुष होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताला एकसंध ठेवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. अनेक शतकांपासून रुजलेल्या चुकीच्या रूढी व परंपरा यांच्या जोखडातून त्यांनी देशाला मुक्त केले व समानता प्रस्थापित केली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तम प्रशासक होते. कठीण परिस्थितीत शिक्षण घेताना त्यांनी समाज उत्थानाचा विचार सोडला नाही. कामगार कल्याण, पाटबंधारे व ऊर्जा या क्षेत्राबद्दल डॉ आंबेडकर यांचे चिंतन आणि कार्य वाखाणण्याजोगे आहे. देशाच्या विकासाचा पाया रचण्याचे कार्य डॉ. आंबेडकर यांनी केले, असेही फडणवीस म्हणाले.

त्यावेळी राज्यपालांसह सर्व मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. भीमज्योतीला वंदन केले तसेच उपस्थित भिक्खूंना चिवरदान केले. दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना भेटवस्तुंचेही वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशीष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, मुद् व जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी मंत्री विजय गिरकर, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, कोकण महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी खासदार राहुल शेवाळे, महानगरपालिकेचे उप आयुक्त प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते आदींसह विविध मान्यवर, अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका मुख्यालयातही आंबेडकर यांची जयंती साजरी

मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ऐतिहासिक सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महानगरपालिका उपसचिव किरण पुजारी त्यावेळी उपस्थित होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ऐतिहासिक सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महानगरपालिका उपसचिव किरण पुजारी त्यावेळी उपस्थित होत्या.