मुंबई : उन्हाळी आणि मोसमी पावसामुळे एप्रिल – मे महिन्यांतील टोमॅटोच्या लागवडीचे नुकसान झाले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून होणारी आवक थंडावली आहे. त्यामुळे देशभरात टोमॅटोचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी दिल्ली, मुंबईसह महत्त्वाच्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर प्रति किलो ८० ते १०० रुपयांवर गेले आहेत. ऑगस्टअखेर दर चढेच राहण्याचा अंदाज आहे.

सध्या बाजारात येणारा टोमॅटो एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या लागवडीपासून येत आहेत. १२ मे च्या दरम्यान राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे टोमॅटोच्या पिकाचे नुकसान झाले होते. परिणामी टोमॅटो उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यानंतर २५ मे पासून मोसमी पाऊस सक्रीय झाला. शेतात चिखल झाल्यामुळे वाफसा नव्हता. त्यामुळे एक जूनच्या दरम्यान होणाऱ्या नव्या लागवडीसाठी शेतजमिनी तयार करता आल्या नाहीत. वाफशा अभावी जूनमधील लागवडी पंधरा दिवस विलंबाने झाल्या. पंधरा जूननंतर झालेल्या नव्या लागवडीपासून मिळणारे टोमॅटो ऑगस्टअखेर पासून बाजारात येण्यास सुरुवात होईल, त्यानंतर टोमॅटोचे दर आवाक्यात येण्याचा अंदाज आहे.

मुंबई, दिल्ली, चेन्नईत शंभरी गाठली

दरवर्षी जुलै महिन्यात टोमॅटोची दरवाढ होते. उन्हाळी, अवकाळी पाऊस, सरासरीपेक्षा जास्त तापमानामुळे उत्पादनात घट होते. त्यामुळे टोमॅटोचा तुटवडा जाणवतो. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश ही प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत. तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशाचा टोमॅटो हंगाम सप्टेंबरपासून सुरू होतो. ऑगस्टमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रात उत्पादन होत असते. यंदा या दोन्ही राज्यांतील उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली, चेन्नईसह देशातील अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये टोमॅटो शंभरीपार गेला आहे. गत काही वर्षे ऑगस्ट महिन्यात दिल्लीत टोमॅटोचे दर १५०- १७५ रुपये किलोपर्यंत गेल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांना प्रतिकिलो ४० ते ६० रुपयेच

कर्नाटक आणि महाराष्ट्रातून होणाऱ्या टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली आहे. दर्जेदार टोमॅटोला शेतकऱ्यांना प्रति किलो ४० ते ६० रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना प्रति किलो ८० ते १२० रुपये मोजावे लागत आहेत. ऑगस्टअखेरपर्यंत दरवाढ कायम राहील, अशी माहिती भाजीपाल्याच्या बाजाराचे अभ्यासक गणेश नाझीरकर यांनी दिली.

हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम

हवामान बदलाचा टोमॅटो पिकावर विपरीत परिणाम होत आहे. अवकाळी पाऊस आणि सरासरीपेक्षा जास्त तापमानामुळे रोपांची अपेक्षित वाढ न होत नाही. रोपांची मर होते. फूल आणि फळांची गळ होण्याचे प्रमाण वाढते. नैसर्गिक आपत्तींमुळे टोमॅटोच्या उत्पादन खर्चाच वाढ झाली आहे. यंदा मे महिन्यात झालेल्या पावसामुळे लागवडी विलंबाने झाल्या आहेत. गत काही वर्षांपासून कडक उन्हाळ्यामुळे उत्पादनात घट होताना दिसत आहे, कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. यशवंत जगदाळे यांनी दिली.