मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका मुंबई ते पुणे रेल्वे मार्गाला बसला आहे. रुळांना हानी झाल्याने कर्जत ते लोणावळा पट्टय़ात बुधवापर्यंत होणारी कामे आणि याच पट्टय़ात आधीच ९ ऑगस्टपर्यंत नियोजित असलेला ब्लॉक यामुळे प्रवाशांचे हाल संपण्याची चिन्हे नाहीत. या कामांसाठी मध्य रेल्वेकडून अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात येत असून प्रवाशांना मुंबई ते पुणे दरम्यान प्रवासासाठी अन्य पर्याय शोधावा लागत आहे.

पावसामुळे मध्य रेल्वेवरील कर्जत-लोणावळा दरम्यान घाट क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्या होत्या. त्यामुळे या पट्टय़ात रेल्वेकडून विविध कामांसाठी २६ ऑगस्ट ते ९ ऑगस्टपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात आला. त्यासाठी डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, पनवेल ते पुणे पॅसेंजर रद्द केल्या. तर कोयना व सह्य़ाद्रीसह अन्य काही एक्स्प्रेस पुण्यापर्यंत येतानाच पुन्हा तेथूनच परतीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला. डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अन्य गाडय़ा आणि त्या मार्गे जाणाऱ्या गाडय़ा मात्र प्रवाशांसाठी उपलब्ध होत्या. त्यामुळे थोडाफार दिलासा या मार्गावरील प्रवाशांना मिळत होता. परंतु २ ऑगस्टपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा पट्टय़ातील आणखी नऊ भागांत रेल्वेची मोठी हानी झाली आणि ३ ऑगस्टपासून उर्वरित एक्स्प्रेस रद्द करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. वेळापत्रक मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाल्याने एक्स्प्रेस गाडय़ांचा वेगही मंदावला आहे. कोल्हापूपर्यंत जाणाऱ्या काही एक्स्प्रेस दौंड, मनमाडमार्गे वळवण्यात येत असून त्यामुळे प्रवास लांबत आहे.

मुंबईतून सुटणाऱ्या गाडय़ा एक ते दोन तास उशिराने सुटत असतानाच त्या नियोजित स्थानकात २० मिनिटे ते अर्धा तास थांबत आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे व कोल्हापूपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांकडून प्रवासासाठी अन्य वाहतुकीचा पर्याय शोधला जात आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी साचलेले पाणी, खड्डे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीही होत आहे. बुधवापर्यंत जरी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असला तरी आधीच ९ ऑगस्टपर्यंत या मार्गावर नियोजित ब्लॉक असल्याने त्यानंतरच सेवा पूर्ववत होतील, हे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस

मुंबई ते भुसावळ पॅसेंजर्स, मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई ते पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई ते आसनसोल एक्स्प्रेस, मुंबई ते नागरकोईल एक्स्प्रेस, मुंबई ते चेन्नई एक्स्प्रेससह आणखी काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.

१५ कोटींचा महसूल बुडाला

गेल्या चार दिवसांत मध्य रेल्वेवरील अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात येत असून त्यामुळे प्रवाशांना तिकिटांचा परतावा द्यावा लागत आहे. आतापर्यंत १५ कोटी रुपये परतावा प्रवाशांना द्यावा लागला आहे.

पश्चिम रेल्वेवरीलही एक्स्प्रेसला फटका

बडोदा येथील पावसामुळे किम, कोसंबा स्थानकात रुळांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचून नुकसान झाले. त्यामुळे ४ ऑगस्टपासून पश्चिम रेल्वेवरील मुंबईतून सुटणाऱ्या गाडय़ा रद्द केल्या जात आहेत.